मुंबई, 13 नोव्हेंबर : टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी आता आपल्यात नाही. जिममध्ये वर्कआउट करत असताना या अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले. अशातच मनोरंजनविश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट लेखक आणि निर्माता राकेश कुमार यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी गुरुवारी 10 नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये एक पोकळी निर्माण झाली असून कलाकार त्यांच्या जाण्याचे दुःख करत आहेत. ज्येष्ठ चित्रपट लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक राकेश कुमार आता या जगात नाहीत. खून पसीना, दो और दो पांच, मिस्टर नटवरलाल आणि याराना यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले राकेश कुमार यांचे 10 नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन झाले. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. राकेश यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. राकेश कुमारच्या जाण्याने बॉलिवूडध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांच्या स्मरणार्थ 13 नोव्हेंबर रोजी अंधेरी, मुंबई येथे प्रार्थना सभा होणार आहे. चित्रपट निर्मात्याच्या कुटुंबाने एक मृत्यूपत्र शेअर केले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे, ‘राकेश कुमार यांच्या स्मरणार्थ, 18 ऑक्टोबर 1941 - 10 नोव्हेंबर 022. कृपया रविवार 13 नोव्हेंबर रोजी द सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब, गार्डन नं. 5, लोखंडवाला, अंधेरी दुपारी 4 ते 5 वाजता श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित रहा.
दरम्यान, राकेश कुमार निधनाबद्दल अमिताभ बच्चन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये एक दीर्घ श्रद्धांजली नोट लिहिली आहे. राकेश कुमार यांनी ‘मिस्टर नटवरलाल’ या आयकॉनिक चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.या चित्रपटात अमिताभ बच्चन, रेखा, कादर खान आणि अमजद खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या.याशिवाय राकेश कुमारने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘खून पसीना’, ‘दो और दो पांच’, ‘कौन जीता कौन हरा’ या आणखी तीन चित्रपटांमध्ये काम केले.