मुंबई 25 मार्च**:** फारुख शेख (Farooq Sheikh) हे बॉलिवूडमधील एक दमदार अभिनेते म्हणून ओळखले जायचे. चष्मे बद्दुर, साथ साथ, कथा, बाझार (Chashme Baddur, Saath Saath, Katha, Bazaar) यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली होती. अमिताभ, धर्मेंद्र, शशी कपूर हे अभिनेते लोकप्रितेच्या शिखरावर असतानाही फारुख शेख यांनी आपल्या अष्टपैलू भूमिकांमधून स्वत:चा असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला होता. चित्रपटांमधून सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या अभिनेत्याचा एक अनोखा किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. केवळ 750 रुपयांसाठी एका निर्मात्यानं त्यांना तब्बल 20 वर्ष ताटकळत ठेवलं होतं. द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत फारुख शेख यांनी या गंमतीशीर किस्सा सांगितला होता. 1973 साली गर्म हवा (Garm Hava) या चित्रपटासाठी फारुख शेख यांना विचारण्यात आलं होतं. सुरुवातीला या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी नकार दिला होता. कारण त्यांना या चित्रपटाची पटकथा आवडलेली नव्हती. परंतु एक वर्षानंतर निर्मात्यांनी पुन्हा एकदा त्या चित्रपटासाठी विचारलं. खरं तर त्यावेळी फारुख शेख यांच्याकडे काहीच काम नव्हतं. त्यामुळं ते होकार देणार होते. पण ते बेरोजगार आहेत हे कळल्यावर त्यांची इमेज डाउन होईल म्हणून त्यांनी मी विचार करतो असं आश्वासन दिलं. अर्थात यावर निर्मात्यानं तब्बल 750 रुपये मानधन देण्याची तयारी दाखवली होती. अवश्य पाहा - 12 वर्ष लहान तरुणीवर प्रकाश राज यांचं होतं प्रेम; मुलांनी केला होता लग्नाला विरोध 70च्या दशकात 750 रुपये एक मोठी रक्कम होती. अन् एका स्ट्रगलर आर्टिस्टसाठी या रकमेचं महत्व आणखी मोठं होतं. केवळ अधिक पैसे मिळणार म्हणून त्यांनी चित्रपटाला होकार दिला. गर्म हवामध्ये फारुख यांनी मनापासून काम केलं. त्या चित्रपटाला फिल्म फेअर पुरस्कार देखील मिळाला. पण निर्मात्यांनी मानधनाची रक्कम काही दिली नाही. प्रत्येक वर्षी 50-100 रुपये देत त्यांनी तो रक्कमेचा आकडा पुर्ण केला. आश्चर्याची बाब म्हणजे 750 रुपये द्यायला निर्मात्यानं तब्बल 20 वर्ष लावली. याबद्दल त्यांनी निर्मात्यांना अनेकदा सुनावलं. कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देखील दिली. परंतु कारवाई लांबली तर वकिलाला देण्यास पैसे नव्हते त्यामुळं त्यांनी मिळतील ते पैसे स्विकारुन शांत बसण्याचा निर्णय घेतला. अर्थात गर्म हवानंतर त्यांना अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.