मुंबई, 14 ऑगस्ट- मराठी चित्रपट आणि नाटक क्षेत्रातआपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता संजय खापरे यांचा एक खास चाहतावर्ग आहे. ते नुकतंच ‘दे धक्का 2’ मध्ये झळकले होते. असं म्हटलं जातं की, त्यांच्या शब्दकोशात ‘नाही’ हा शब्दच नाही. ‘डोन्ट वरी हो जायेगा’ हा त्यांचा कानमंत्र आहे. हाच कानमंत्र सोबत ठेऊन रंगभूमीवर एक नाटक घेऊन येण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. या नाटकाचं दिग्दर्शन स्वतः संजय खापरे यांनी केलं आहे. नाटकाची निर्मितीप्रिया पाटील, नंदकिशोर पाटील, उदय साटम यांनी केली आहे. या नाटकाचा प्रयोग 15 ऑगस्टला दुपारी 4.30 वा. प्रबोधनकार ठाकरे बोरिवली आणि 16 ऑगस्टला दुपारी 4.30 वा. गडकरी रंगायतन येथे होणार आहे. एखाद्या व्यक्तीनं सकारात्मक भावना मनात आणली तर आपलं काम सहज चांगलं होऊ शकतं. या मध्यवर्ती संकल्पनेवर ‘डोन्ट वरी हो जायेगा’ या नाटकाचा विषय आधारित आहे. प्रत्येक खडतर परिस्थितीत स्वतःला समजवत राहायचं… ‘डोन्ट वरी हो जायेगा’ कारण जिंकण्याची पहिली पायरी एक छोटी आशा असते. या नाटकाच्या दिग्दर्शनाची आणि अभिनयाची धुरा संजय खापरे यांनी सांभाळली आहे. मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या संजयसोबत या नाटकात सुपर्णा श्याम, रोहित मोहिते, आसावरी ऐवळे यांसारख्या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. याबद्दल बोलताना संजय खापरे यांनी म्हटलं,‘अभिनय–दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका मी या नाटकासाठी साकारत असून दिग्दर्शक म्हणून माझं हे दुसरं नाटक आहे. परिस्थितीपुढे हात न टेकवता तिला सडेतोड उत्तर देतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. हा कानमंत्र यातून सांगितला आहे. हा आशय हलक्या-फुलक्या रीतीने मांडत मनोरंजनातून अंजन घालण्यात आलं आहे. टेन्शन फ्री हे नाटक प्रेक्षक एन्जॉय करतील याची मला खात्री आहे’’. (हे वाचा: Amol Kolhe: ‘एका अनोळखी चेहऱ्याने, अतिशय ओळखीचं हास्य दिलं’; कार्यकर्त्याच्या रिक्षातून अमोल कोल्हेंची सवारी ) या नाटकाची मूळ संकल्पना राहुल पिंगळे यांची असून, नाटकाचं लेखन रोहित मोहिते आणि रोहित कोतेकर यांनी केलं आहे. नेपथ्य महेश धालवलकर तर प्रकाशयोजना अमोघ फडके यांची आहे. या नाटकासाठी गीत लिहण्याची जबाबदारी ललित युवराज आणि संगीताची जबाबदारी मितेश चिंदरकर यांनी पार पाडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.