मुंबई, 14 ऑगस्ट- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. कधी राजकीय पोस्ट तर कधी मनोरंजन क्षेत्राशी निगडित पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे आगामी प्रोजेक्ट तसेच काही सामाजिक उपक्रम याबद्दलची माहिती ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असतात.तसेच ते खासदार म्हणून सतत विविध भागांना भेटी देत असतात. भेटीदरम्यानचे किस्से आणि घडामोडी ते चाहत्यांपर्यंत आणि आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवत असतात. अमोल कोल्हे यांचा सोशल मीडियावरील वावर मोठा आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्याला सतत काही ना काही नवनवीन पाहायला मिळत असतं. आजही असंच काहीसं आलं आहे. अमोल कोल्हे यांनी नुकतंच आपल्यासोबत घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. त्यांची इन्स्टा पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाहूया काय आहे नेमकी पोस्ट. डॉ. अमोल कोल्हे पोस्ट- ‘‘खरंतर रस्त्यावरचं ट्राफीक चुकविण्यासाठी आपण रेल्वेचा पर्याय निवडतो आणि रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर असलेल्या गर्दीतून वाट काढताना अचानक अमोलभाऊ अशी हाक कानावर येते. आणि समोर एक अनोळखी चेहरा, अगदी ओळखीचं स्मितहास्य देत असतो. आणि कळलं की हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता भानुदास कदम. आणि भानुदास भाऊंनी आपुलकीने विचारलं, “गाडी आहे की माझ्या गाडीतून येणार..?” आणि त्यांच्या गाडीतली आजची सवारी ही ग्राउंड लेवलला काय चाललंय, काय घडतंय या सगळ्याची खूप जास्त माहिती देणारी होती.भानुदासजी! तुमच्या या आपुलकीबद्दल, मायेबद्दल आणि तुमच्या सूक्ष्म राजकीय निरीक्षणाबद्दल मनःपूर्वक आभार…’’
(हे वाचा: ) अमोल कोल्हे हे जितके प्रसिद्ध राजकारणी आहेत, ते तितकेच लोकप्रिय अभिनेतेसुद्धा आहेत. त्यांनी स्टार प्रवाहवरच्या ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत शिवरायांची भूमिका साकारली होती. तसंच ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या झी मराठीवरच्या मालिकेतून त्यांनी संभाजी महाराजांचं कार्य घराघरात पोहोचवलं होतं. अमोल कोल्हे अभिनया आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहेत. ते सध्या राष्ट्रावादीकडून शिरूर मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. याआधी ते शिवसेनेत होते.