मुंबई, 30 एप्रिल- भारतीय सिनेसृष्टीचे निर्माते म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखलं जातं. 1969 साली दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ मनोरंजनसृष्टीत पुरस्कार देण्यास सुरुवात झाली होती. पहिल्यांदा अभिनेत्री देविका राणीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आज दादा साहेबांची 153 वी जयंती साजरी केली जात आहे. दादासाहेब चित्रपटांच्या निर्मितीबाबत इतके गंभीर होते की, त्यांनी आपला पहिला चित्रपट बनवण्यासाठी नायिका शोधण्यासाठी चक्क रेड लाईट एरियातही पोहोचले होते. यामागेही मोठं कारण होतं. दादासाहेब फाळकेंचा जन्म नाशिकमधील त्र्यंबकेश्वर याठिकाणी झाला होता. दादासाहेबांच्या वडिलांबाबत सांगायचं तर ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. शिवाय ते एक संस्कृतज्ञदेखील होते. दादासाहेब फाळकेंनी जे. जे. स्कुल ऑफ आर्ट, मुंबई महाविद्यालयात आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. आणि इथूनच ते खऱ्या अर्थाने रेखाटन, छायाचित्रणकला, तंत्रज्ञान,शिल्पकला, इत्यादी गोष्टी शिकले होते. (हे वाचा: Prabhu Deva: दुसऱ्या लग्नानंतर पहिल्यांदाच पत्नीसोबत दिसले प्रभू देवा; कोरोना काळात गुपचूप केलेलं लग्न ) दादासाहेब फाळकेंनी ‘राजा हरिशचंद्र’ या पहिल्या सिनेमाची निर्मिती केली होती. त्यांच्या पहिल्या सिनेमाच्या निर्मितीचा किस्सा फारच रंजक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दादासाहेंबांना आपल्या पहिल्या सिनेमासाठी अभिनेत्री मिळणं फारच कठीण झालं होतं. अनेक प्रयत्न करुनसुद्धा कोणीही त्यांच्या सिनेमात अभिनेत्री म्हणूनकाम करायला तयार नव्हतं. यामागे कारणसुद्धा तसंच होतं.
दादासाहेब फाळके यांचं बजेट फक्त 15 हजार रुपये होतं. आणि या बजेटमध्येच त्यांना पहिला चित्रपट करायचा होता. यानंतर दादासाहेब फाळके बराच काळ नायिकेचा शोध घेत राहिले. एवढ्या तुटपुंज्या रकमेत काम करायला कोणी तयार नसल्यामुळे त्यांना चित्रपटासाठी नायिका मिळाली नाही. यानंतर दादा साहेबांनी माघार न घेता दादासाहेबांनी रेड लाईट एरियात जाऊन आपल्या नायिकेचा शोध घेतला. मात्र, दादासाहेबांना याठिकाणीसुद्धा आपली नायिका मिळाली नाही. त्यामुळे दादासाहेब निराश होऊन एका हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले. इथे चहा पीत असताना दादा साहेबांची नजर एका मुलीवर पडली आणि दादा साहेबांनी तिला आपली नायिका बनवली. 30 एप्रिल 1870 रोजी नाशिक, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या दादा साहेबांनी पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ बनवला. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास रचला होता. दादासाहेब फाळके यांना चित्रपटांची इतकी आवड होती की ते रोज 4-5 तास चित्रपट पाहात असत. दादासाहेब फाळके ड्रेस डिझाईनपासून ते संपूर्ण चित्रपट निर्मितीपर्यंत प्रत्येक गोष्ट स्वतःच सांभाळायचे. आपल्या 19 वर्षांच्या सिने कारकिर्दीत दादासाहेब फाळकेंनी तब्बल95 चित्रपट आणि 26 लघुपटांची निर्मिती केली आहे. आज त्यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट कलाकारांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं.