मुंबई, 05 सप्टेंबर: तुम्ही चित्रपट पाहत असा किंवा नसा, ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असणार. पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार आणि मधुबाला अशा दिग्गज कलाकारांनी गाजवलेला हा चित्रपट बॉलिवूडमधील तेव्हाचा सर्वांत महागडा चित्रपटही मानला जातो. असं म्हणतात की हा चित्रपट पूर्ण होण्यास तब्बल 14 वर्षांचा कालावधी लागला होता. या चित्रपटात उभारण्यात आलेले भव्य सेट हे आजही चर्चेचा विषय ठरतात. ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या एका गाण्याच्या सेटसाठी तेव्हाचे 15 लाख रुपये खर्च आला होता. एवढं सगळं होऊ शकलं ते केवळ शापूरजी पालोनजी यांच्यामुळे. कोण होते शापूरजी, आणि बॉलिवूडशी त्यांचं काय नातं होतं? जाणून घेऊया. रविवारी (4 सप्टेंबर 22) देशातील दिग्गज व्यावसायिक आणि टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं अपघातात निधन झालं. अहमदाबादवरून मुंबईला येताना पालघरजवळ त्यांची गाडी डिव्हायडरला धडकली, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री हे देशातील नामवंत व्यावसायिकांपैकी एक होते. त्यांचेच आजोबा हे शापूरजी पालोनजी. शापूरजी हे मोठे अब्जाधीश होते, त्यांना सिनेमांची भरपूर आवड होती. यातूनच त्यांनी मुघल-ए-आझमची निर्मिती केली. सुमारे 62 वर्षांपूर्वी म्हणजे 1960 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या बॅनरखाली बनवण्यात आला होता. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तेव्हाचे दीड कोटी केले खर्च हेही वाचा - बॉलिवूडचे चित्रपट अपयशी का होतात?; अभिनेत्री पल्लवी जोशींनी सांगितलं कारण या चित्रपटातील भव्यदिव्य सेट हे आजही चर्चेचा विषय ठरतात. ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या गाण्यासाठी शीश महाल म्हणजे काचेच्या महालाचा उभारलेला सेट आजही चित्रपटरसिकांना थक्क करतो. या सेटबद्दल असं बोललं जातं, की दिग्दर्शकांना न आवडल्यामुळे कित्येक वेळा हा सेट तोडून पुन्हा उभारण्यात आला होता. अशा तर्हेने हा सेट तयार होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागला. यासाठी तेव्हाचे 15 लाख रुपये खर्च आला होता. अशा रितीने इतर गोष्टींवरही पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला, आणि या चित्रपटाचं एकूण बजेट तेव्हाचे 1.5 कोटी रुपये झालं. शापूरजींना पूर्ण विश्वास होता की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालणार. त्यांचा हा विश्वास खरा ठरला, आणि या चित्रपटाने केवळ भारतातच तब्बल 11 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. झगमगाटापासून दूर आहे कुटुंब शापूरजी यांचे पुत्र, आणि सायरस यांचे वडील पालोनजी हे मीडिया आणि इतर गोष्टींपासून दूरच राहणं पसंत करायचे. सुमारे 10 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 55 हजार कोटी रुपयांची संपत्ती असूनही, ते अगदी कमी चर्चेत असायचे. 28 जून 2022 ला त्यांचं निधन झालं. मिस्त्री कुटुंबीयांची टाटा सन्समध्ये 18.5 टक्के भागीदारी आहे. तेच या कंपनीतील सर्वांत मोठे इंडिव्हिजुअल शेअरहोल्डर आहेत. यासोबतच कन्स्ट्रक्शन, इंजिनीअरिंग, रिअल एस्टेट अशा विविध प्रकारच्या व्यवसायांमध्ये मिस्त्री कुटुंबीय आहेत. शापोरजी पालोनजी इंजिनीअरिंग अँड कन्स्ट्रक्शन, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, फोर्ब्स टेक्सटाईल्स, गोकक टेक्सटाईल्स, युरेका फोर्ब्ज, फोर्ब्ज अँड कंपनी, एसपी कन्स्ट्रक्शन मटेरिअल ग्रुप, एसपी रिअल एस्टेट आणि नेक्स्ट जेन अशा कित्येक कंपन्या मिस्त्री कुटुंबीयांच्या मालकीच्या आहेत. जगभरातील सुमारे 50 देशांमध्ये या कुटुंबाचा व्यवसाय पसरलेला आहे. पालोनजी यांनी पाट्सी पेरिन डुबास या आयरिश महिलेशी लग्न केलं होतं, ज्यानंतर ते आयर्लंडचे नागरिक झाले आणि तेथेच स्थायिक झाले. सायरस मिस्त्री यांचाही जन्म आयर्लंडमध्येच झाला होता, मात्र ते बहुतांश वेळ आपल्या मुंबईतील बंगल्यावर राहत. मिस्त्री कुटुंबीय हे पारसी समुदायातील आणि आयर्लंड देशातील सर्वांत श्रीमंत कुटुंब मानलं जातं. सायरस मिस्त्री यांच्या पश्चात फिरोज आणि जहान मिस्त्री ही दोन मुलं, आणि पत्नी रोहिका छागला आहेत. सायरस यांची एकूण संपत्ती सुमारे 70 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.