मुंबई, 07 डिसेंबर: उरी: द सर्जिकल स्ट्राईक, पिंक, मिशन मंगल असे चित्रपट असोत किंवा फोर मोअर शॉर्ट् प्लीजसारखी वेब सीरिज. अभिनेत्री किर्ती कुल्हारीने (Kirti Kulhari) प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आपला ठसा उमटवला आहे. किर्तीची क्रिमिनल जस्टिस ही वेब सीरिजही अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. किर्ती कुल्हारीने नवभारत टाइम्सशी नुकतीच बातचीत केली. यावेळी तिने विवाहानंर होणाऱ्या बलात्काराबद्दल आपलं मत मांडलं. किर्ती म्हणते, ‘वैवाहिक बलात्कार विशिष्ट समाजातच होतो असं नाही. तर हा आपल्या सामाजिक परिस्थितीचा प्रश्न आहे. बंद खोलीत पती-पत्नींनाएकमेकांजवळ येताना देखील दोघांची इच्छा असणं आवश्यक आहे. वैवाहिक बलात्काराविरोधात शिक्षेची तरतूद का नाही? असा सवाल तिने केला आहे. तसंच, हा अपराध कायद्याअंतर्गत गुन्हा मानला पाहिजे आणि त्याला शिक्षाही झाली पाहिजे.’ असं परखड मत तिने मांडलं. ‘वैवाहिक बलात्कार छोट्या वर्गात किंवा अशिक्षित लोकांमध्ये होतो, हा एक गैरसमज आहे. मुलींना असं सांगितलं जातं की, लग्नानंतर तू तडजोड करायलाच हवीस. लग्नानंतर बरेचदा इच्छा नसतानाही पत्नीला केवळ पतीच्या इच्छेसाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. स्त्रीच्या इच्छेविरुद्ध बरेचदा शरीर सुखही द्यावं लागतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. वैवाहिक बलात्काराला शिक्षेची तरतूद असायलाच हवी. कायदे थोडे कठोर करण्याची गरज आहे.’
किर्ती कुल्हारीची ‘क्रिमीनल जस्टिस’ सीरिज याच विषयावर भाष्य करणारी आहे. किर्ती कुल्हारीने आजपर्यंत अनेक संवेदनशील विषय हाताळले आहेत. फोअर मोअर शॉट्स प्लीज या वेब सीरिजमध्येही एकल मातृत्वाची जबाबदारी असणाऱ्या स्त्रीची भूमिका तिने उत्तमरित्या साकारली होती.