मुंबई, 11 ऑक्टोबर- या वर्षी भारतातून ऑस्करमध्ये दाखल झालेला गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ चा बालकलाकार राहुल कोळी याचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. राहुल अवघ्या 10 वर्षांचा होता. ल्युकेमिया आजाराने या बालकलाकाराचा मृत्यू झाला आहे. 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्याचं निधन झालं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी जामनगरजवळील त्याच्या मूळ गावी हापा येथे प्रार्थना सभा आयोजित केली होती. राहुलचे वडील रामू हे एक रिक्षाचालक आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तीन दिवस आधी या बालकलाकराच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. राहुलला ब्लड कॅन्सर म्हणजेच ल्युकेमिया या आजाराने ग्रासलं होतं. या बालकलाकारावर गेल्या चार महिन्यांपासून अहमदाबाद येथील गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू होते. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर 4 महिन्यांनी राहुलला आजार झाल्याचं समजलं होतं. सुरुवातीला त्याला किंचितसा ताप होता पण औषधोपचारानंतरही तो बरा होत नव्हता. रविवारी त्याने नाष्टा केल्यानंतर त्याला सतत ताप येत होता. त्याला 3 वेळा रक्ताच्या उलट्याही झाल्या होत्या. (**हे वाचा:** Arun Bali Death: 3 इडियट्स फेम ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन;झाला होता दुर्मिळ आजार ) फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 12 दिवसांपूर्वीच 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ‘छेलो शो’ या गुजराती चित्रपटाची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड केली होती. ‘छेलो शो’चे दिग्दर्शन यूएसस्थित दिग्दर्शक पॅन नलिन यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा त्यांच्याच जीवनापासून प्रेरित आहे. हा दिग्दर्शक सौराष्ट्रात लहानाचा मोठा झाला आणि त्याने फिल्मी दुनियेची जादू शोधून काढली. चित्रपटाची कथाही अशीच आहे. राहुल कोळीने या चित्रपटात मनूची महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तो एका रेल्वे सिग्नलमनचा मुलगा असतो. त्याने चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या समयच्या जवळच्या मित्राची भूमिका साकारली होती. चित्रपटात तब्बल 6 बालकलाकार आहेत. याबाबत बोलताना चित्रपट निर्माते नलिन म्हणाले की, राहुलच्या निधनाने चित्रपटाशी निगडित सर्वांना प्रचंड दु:ख झालं आहे. “आम्ही कुटुंबासोबत होतो.पण त्याला वाचवता आलं नाही.” या चिमुकल्याच्या निधनाने सर्वानांच धक्का बसला आहे. लेकाच्या निधनाने राहुलचे वडील कोसळून गेले आहेत. याबाबत बोलतांना त्यांनी सांगितलं की, “तो खूप आनंदी होता आणि 14 ऑक्टोबरनंतर आमचं आयुष्य बदलेल असं मला अनेकदा सांगत होता. पण त्याआधीच तो आम्हाला सोडून निघून गेला." 14 ऑक्टोबरला म्हणजेच येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दुर्दैव म्हणजे त्याच दिवशी राहुलच्या निधनाचा 13वा दिवस असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.