मुंबई, 10 मे: प्रसिद्ध भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे (Pandit Shivkumar Sharma Death) निधन झाले आहे. भारतीय संगीतातील त्यांच्या अनोख्या कौशल्यामुळे त्यांचे नाव जगभर झाले होते. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूर वादक (Santoor maestro Pandit Shivkumar Sharma) अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. बॉलिवूडमध्ये शिव-हरी (शिवकुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया) या जोडीने अनेक गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. चांदनी सिनेमातील ‘मेरे हाथों में नौ-नौ चूडियाँ’ या गाण्यासाठी देखील या जोडीने संगीत दिले होते. हे गाणे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. 15 मे रोजी होणार होती कॉन्सर्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार काहीच दिवसांनी ते एका मोठ्या कॉन्सर्टमध्ये सहभागी होणार होते. 15 मे रोजी होणाऱ्या या कॉन्सर्टमध्ये पं. शिवकुमार शर्मा यांच्यासह हरि प्रसाद चौरसिया देखील गाणार होते. या कार्यक्रमाची विशेष तयारी देखील सुरू होती, मात्र त्याआधी काहीच दिवस पं. शिवकुमार शर्मा यांनी जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Our cultural world is poorer with the demise of Pandit Shivkumar Sharma Ji. He popularised the Santoor at a global level. His music will continue to enthral the coming generations. I fondly remember my interactions with him. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 10, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पं. शिवकुमार शर्मा यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त करत त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत पं. शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे ट्वीट केले आहे की, ‘पंडित शिवकुमार शर्मा जी यांच्या निधनाने आपले सांस्कृतिक जगाचे नुकसान झाले आहे. त्यांनी संतूर वाद्याला जागतिक स्तरावर लोकप्रिय केले. त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांना भुरळ घालत राहील. मला त्यांच्याशी झालेला संवाद आजही आठवतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि चाहत्यांप्रती संवेदना. ओम शांती.’ यासह संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी, चाहत्यांनी या असामान्य व्यक्तीमत्वाच्या जाण्याने दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.