मुंबई, 6 नोव्हेंबर- बॉलिवूड कलाकार आणि चाहते यांचं नातं फारच वेगळं आहे. कधी चाहते आपल्या आवडत्या कलाकरांना भेटण्यासाठी आणि त्यांना खुश करण्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. तर कधी कधी कलाकार आपल्या चाहत्यांना अनपेक्षितपणे काही खास सरप्राईज देत असतात. बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांनी कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसतानाही बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चतुर्वेदी होय. या नवोदित अभिनेत्याने फारच कमी वेळेत आपला ठसा उमठवायला सुरुवात केली आहे. सिद्धांत चतुर्वेदीची फॅन फॉलोइंग नक्कीच वाढली आहे यात शंका नाही. आपल्या ‘फोन भूत’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जेव्हा तो दिल्लीत आला तेव्हा अभिनेत्याला धक्काच बसला. त्याला खरंच आश्चर्य वाटलं. शनिवारी हा अभिनेता दिल्लीतील एका कॉलेजमध्ये शेकडो महिला चाहत्यांनी वेढलेला दिसला. सध्या सिद्धांतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी एका कॉलेजच्या आत उभा आहे आणि काहीशा द्विधा अवस्थेत आहे. कारण महिला चाहत्या त्याला मोठमोठ्याने हाक देत आहेत आणि फोटोसाठी धडपड करत आहेत. अभिनेत्याचे सुरक्षारक्षक चाहत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले. सिद्धांतच्या ‘फोन भूत’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात कतरिना कैफ आणि ईशान खट्टर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. **(हे वाचा:** जान्हवी कपूरच्या रुमर्ड बॉयफ्रेंडचं नक्की चाललंय काय?; आता बोनी कपूरला मारली मिठी ) या हॉरर कॉमेडी चित्रपटाचं दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केलं आहे. यात जॅकी श्रॉफ आणि शीबा चढ्ढा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा एका भूताची आहे जो दोन घोस्टबस्टरशी संपर्क साधतो. पण, जेव्हा भयानक भूत हळूहळू त्याचा हेतू प्रकट करतो तेव्हा सर्वकाही बदलतं. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याचीदेखील जोरदार चर्चा होत आहे. सिद्धांत आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सतत सुरु आहेत.
दरम्यान सिद्धांतने एका मुलाखतीत नव्याचं नाव न घेता म्हटलं होतं की, या गोष्टीत काही तथ्य नाही, पण असं व्हावं अशी त्याची इच्छा आहे. याबाबत बोलतांना त्याने म्हटलं होतं की, ‘मी डेट करत असल्याच्या अफवा आहेत. पण कदाचित हे सत्य असतं तर बरं झालं असतं.’ कामाच्या बाबतीत सांगायचं तर, सिद्धांत आगामी काळात ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात अनन्या पांडे आणि आदर्श गौरव देखील प्रमुख भूमिकेत आहेत. यापूर्वीही सिद्धांतने अनन्या पांडेसोबत ‘गेहरायियां’ या चित्रपटात काम केलं आहे. ज्यामध्ये दीपिका पादुकोणही मुख्य भूमिकेत होती.
सिद्धांत चतुर्वेदीने आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या ‘गली बॉय’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात सिद्धांत चांगलाच प्रसिद्धीस आला होता. फारच कमी वेळेत सिद्धांतने चांगली लोकप्रियता मिळवली आहे. त्याचा चाहतावर्ग अफाट वाढला आहे. व्हायरल व्हिडीओवरुन या गोष्टीचा नुकताच प्रत्यय आला आहे.