मुंबई,12 मे- सध्या साऊथ चित्रपट (South Movies) जगभरात धुमाकूळ घालत आहेत. अशातच देशात बॉलिवूड व्हर्सेस साऊथ शीतयुद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान साऊथ स्टार महेश बाबूने (Mahesh Babu) बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य करुन खळबळ माजवून दिली आहे. अशातच आता सोशल मीडियावर विविध कलाकार संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये आता बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते मुकेश भट्ट (Mukesh Bhatt) यांचासुद्धा समावेश झाला आहे. इंडिया टुडेशी संवाद साधताना मुकेश भट्ट म्हणाले, “महेश बाबू जे बोलले त्यात काहीही चुकीचं नव्हतं. जर बॉलिवूड त्यांना त्यांची योग्य किंमत देऊ शकत नसेल तर ती चांगली गोष्ट आहे. मी त्याला शुभेच्छा देतो. तो जिथून आला त्या ठिकाणाचा मी आदर करतो. महेश बाबू यांच्याकडे टॅलेंट आहे आणि या टॅलेंटची किंमत आहे. जी त्यांनी वर्षानुवर्षे काम करुन निर्माण केली आहे. तो खूप यशस्वी अभिनेता आहे. त्याला आपल्या बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीकडून जे काही हवं आहे, जर आपलं बॉलिवूड त्याच्या अपेक्षा पूर्ण करत नसेल तर त्यात गैर काहीच नाही’’. पुढे बोलताना मुकेश भट्ट म्हणाले, “एखाद्याच्या प्राइस टॅगवरुन का नाराज व्हावं? जर मला एखाद्यासाठी फुकटात काम करायचं असेल तर ती माझी निवड आहे. आणि जर मी एखाद्या गोष्टीसाठी 100 कोटी रुपये आकारत असेल तर ती देखील माझी निवड आहे. आमच्या व्यवसायात निश्चित अशी किंमत नाही. निम्म्या किंमतीत काम करणाऱ्या अभिनेत्यांसोबतही मी काम केलं आहे.कारण त्यांना फक्त प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम हवं असतं. इथे दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री इत्यादींचं मानधन एकमेकांवर अवलंबून असतं. त्यामुळे ती किंमत बदलत राहते. हा एक स्थिर उद्योग नाही. चित्रपटातील अनेक गोष्टी पाहून फी ठरवली जाते. त्यामुळे कुणी किती मानधन घेऊन काम करणार, काय निर्णय घेणार हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. दरम्यान मुकेश भट्ट म्हणाले, “कधीकधी या सर्व गोष्टी निर्माता किंवा दिग्दर्शकाशी तुमचं नातं कसं आहे यावरही अवलंबून असतं. काहीवेळा एखादा अभिनेता एखाद्या दिग्दर्शकासोबत कमी मानधनात किंवा फुकटात काम करण्यास तयार होतो कारण त्याला त्या यशस्वी दिग्दर्शकासोबत काम करायचं असतं. मी या भावनेचा आदर करतो.” मुकेश भट्ट पुढे म्हणाले की, “खरं सांगायचं तर महेश बाबू बॉलिवूडला परवडत नाही असं का म्हणाले हे मला कळत नाही. त्यांच्या असं म्हणण्यामागे काय कारण होते, मला माहीत नाही.एक अभिनेता म्हणून ती त्यांची निवड आहे.“असं म्हणत मुकेश भट्ट यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. महेश बाबू नेमकं काय म्हणाला?- अदिवी शेष यांच्या ‘मेजर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला (Major Movie launch) महेश बाबू उपस्थित होते. यावेळी त्यांना बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार आहात, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महेश बाबू म्हणाला, “मला बॉलिवूडमधून कित्येक ऑफर्स मिळतात. मात्र, मला नाही वाटत की मला ते लोक अफोर्ड करू शकतील. जे लोक मला अफोर्ड (Bollywood can’t afford me says Mahesh Babu) करू शकत नाहीत, अशा इंडस्ट्रीमध्ये मला काम नाही करायचं.” यामुळे महेशबाबू हिंदीमध्ये पदार्पण करणार नाही हे निश्चित झालंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.