मुंबई, 2 एप्रिल- ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसह नुकतंच मुंबईत पोहचली. पहिल्यांदाच तिनं आपल्या मुलीला मुंबईत आणलं आहे. तिघांनीही पापाराझींना खास पोज दिल्या आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. मुंबईत आल्यानंतरच प्रियांकानं नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. तेव्हा निकसोबत तिनं अनेक फोटोही काढले. या सगळ्यातच प्रियांकानं चाहत्यांसाठी एक खूशखबरही दिली आहे. निक आणि त्याचे भाऊ मुंबईत एक शो करणार असून त्यासाठी जोनास बंधू तयार आहेत, असं प्रियांकानं सांगतिलंय. NMACC च्या उद्घाटन सोहळ्यात प्रियांका आणि निक उत्साहात दिसत होते. यावेळी दोघांनी पापाराझींसोबत गप्पाही मारल्या आणि आपल्या करियर प्लॅनिंगबाबत काही गोष्टी शेअरही केल्या. निक म्हणाला की, “इथं येऊन अभिमान वाटतोय.” यावर प्रियांकानं मध्येच अडवलं आणि म्हणाली की, “तुम्ही लोकांनी इथं येऊन परफॉर्म केलं पाहिजे.” यावर निकनंही “आम्हाला इथं परफॉर्म केलं पाहिजे, चांगली आयडिया आहे. आम्ही इथं कधीही शो केला नाही, तो खरंच खूप चांगला होईल” असा सकारात्मक प्रतिसाद दिला. निक आणि जोनास बंधूंनी मुंबईत परफॉर्म केलेलं पाहणं खरंच चांगला अनुभव असणार आहे. पुढं बोलताना प्रियांकानं NMACC कार्यक्रमाचं खूप कौतुक केलं. ती म्हणाली की, “नीता यांनी भारतीय संस्कृतीसाठी बरंच काही केलं आहे. जगभरातील भारतीयांठी अंबानी परिवाराचं योगदान मोठं आहे. मी खूप काळापासून मुंबईत राहत आले आहे आणि मला वाटतं की हे एक भरगच्च शहर आहे. आम्हाला शो करण्यासाठीही जागा शोधावी लागते. परंतु, असं काही करण्यासाठी वेळ काढणं आणि एवढं सुंदर केंद्र उभारणं हे सगळंच अद्भुत आहे.”
दरम्यान, प्रियांका तिच्या आगामी सीरिज ‘सिटाडेल’चं प्रमोशनही मुंबईत करणार आहे. सिटाडेलचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला आणि चाहत्यांनी तो खूप आवडलाही आहे. प्रियांका फिल्म प्रमोशननंतर आपली लाडकी बहीण परिणिती चोप्राला भेटणार आहे. मीडियातील सूत्रांच्या माहितीनुसार ती परिणितीचा रूमर्ड बॉयफ्रेंड नेता राघव चड्ढा यांचीही भेट घेणार आहे. तसेच परिणिती आणि राघव यांचा साखरपुडा प्रियांका आणि निक यांच्या उपस्थितीतच होणार असल्याचा दावा केला जात आहे.
प्रियांका हॉलीवडमधील सिटाडेल सीरिजमध्ये दिसणार आहे. त्यासोबतच लवकरच ती बॉलीवूड पटातही दिसणार आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित चित्रपट ‘जी ले जरा’चं काम सुरू आहे. लवकरच आलिया भट आणि कॅटरिना कैफ सोबत प्रियांका चित्रिकरण करणार आहे.