मुंबई,5 मे- मंदिरा बेदी (Mandira Bedi) हे नाव मनोरंजन सृष्टीत सर्वांच्याच ओळखीचं आहे. या अभिनेत्रीने अभिनयच नव्हे तर होस्टिंगमधूनसुद्धा आपली खास ओळख बनविली आहे. मंदिरा बेदी तिच्या फिटनेस आणि हेअरकटमुळे खूप चर्चेत असते. मंदिराच्या सध्याच्या शॉर्ट हेअरकटला (Short Haircut) आता बरीच वर्षे उलटून गेली असली तरी, आजही तिला ‘शांती’ म्हणून पाहिलेले तिचे चाहते आजही विचारात आहेत की मंदिरा बेदीने आपले इतके छान, लांब आणि कुरळे केस का कट केले? आता स्वतः मंदिरानेच याचं उत्तर दिलं आहे आणि हेअरकट केल्याने इंडस्ट्रीत तिच्यासाठी किती बदल झाला आहे हेही सांगितलं आहे. मंदिरा बेदीने 1994 मध्ये डीडी नॅशनलची प्रसिद्ध मालिका ‘शांती’ मधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ज्यामध्ये तिने अतिशय स्ट्रॉन्ग मुलीची भूमिका साकारली होती. ‘शांती’ या व्यक्तिरेखेमुळे मंदिरा बेदी घरोघरी लोकप्रिय झाली होती. यानंतर तिने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ सारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. यावेळी प्रेक्षकांना मंदिरा लांब कुरळ्या केसांमध्ये दिसली होती. त्यानंतर काही वर्षांनंतर एका रिअॅलिटी शोदरम्यान मंदिराने तिचे केस कापल्याचं दिसून आलं होतं.त्यांनतर आजपर्यंत अभिनेत्रीचा हाच हेयरकट पाहायला मिळत आहे. पिंकविलाला दिलेल्या एका खास मुलाखतीत मंदिराने सांगितले की, ‘‘ती तिच्या लांब केसांमुळे आनंदी नव्हती. आणि तिला समाजात अनेक गोष्टी चुकीच्या असल्याचे सिद्ध करायचे होते. मंदिरा म्हणाली की, ‘मला दररोज माझे कुरळे केस स्ट्रेट करण्याची काळजी वाटत होती. म्हणून मी एके दिवशी सलूनमध्ये जाऊन माझे केस कापून घेण्याचे ठरवले. तर केस कापणाऱ्याने मला विचारले, “तुला खात्री आहे का? तुला खरच तुझे केस लहान करायचे आहेत का?” मंदिरा पुढे म्हणाली, “मी त्यांना ‘हो’ म्हणाले. तरीही, हेअरकट करणाऱ्याने माझे केस खांद्यापर्यंत कापले आणि मला सांगितलं, ‘उद्या पुन्हा एकदा विचार कर की, तुला खरंच केस लहान करायचे आहेत का?’. मी घरी परत आले. मग, दुसऱ्या दिवशी मी सलून उघडण्याआधीच पोहचले आणि त्यांना माझे केस कापायला सांगितले… आणि अशा प्रकारे मी माझे केस लहान केले. गेल्या 12 वर्षांपासून माझे केस लहान आहेत.”
Mandira Bedi
मंदिरा पुढे म्हणाली, “मी जेव्हापासून केस कापले तेव्हापासून मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळाल्या आहेत. मला किमान 10 पोलिसांच्या भूमिका आणि किमान 5-6 नकारात्मक भूमिकांच्या ऑफर आल्या आहेत. म्हणजेच, आता लोकांनी मला एका सशक्त आधुनिक स्त्रीच्या भूमिकेसाठी निवडले आहे. त्यामुळे माझे लहान केस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मला लहान केस आवडतात आणि मला पाहिजे तितके लांब ठेवीन. जर माझ्याकडे एखादी भूमिका आली ज्यासाठी मला माझे केस वाढवावे लागतील, तर मी त्याबद्दल विचार करेन.“असं म्हणत अभिनेत्रीने आपल्या लहान केसांचं गुपित उघड केलं आहे.