मुंबई, 29 ऑगस्ट : मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सुपरस्टार चॅडवीक बोसमन (Chadwick Boseman) याचे वयाच्या 43 व्या वर्षी निधन झाले आहे. ब्लॅक पँथर (Black Panther) फेम चॅडवीकच्या निधनामुळे संपूर्ण हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. गेले चार वर्ष हा अभिनेता कोलोन कॅन्सरशी लढत होता. मात्र त्याची ही लढाई अखेर संपली आणि चॅडवीकची प्राणज्योत मालवली. त्याच्या कुटुंबाने अधिकृत स्टेटमेंट जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
— Chadwick Boseman (@chadwickboseman) August 29, 2020
बोसमन विशेष प्रसिद्ध होता ते म्हणजे त्याच्या मार्व्हल सीरीजच्या ‘ब्लॅक पँथर’मधील भूमिकेसाठी. लॉस एंजलिसमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला, यावेळी त्याची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते. कुटुंबीयांनी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये असे म्हटले आहे की, ‘तो खरंच लढवैय्या होता. चॅडविकने संघर्षाच्या काळातही प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांसाठी केला. प्रेक्षकांनीही या चित्रपटांवर खूप प्रेम केलं. गेल्या चार वर्षांमध्ये बोसमनने अनेक सिनेमा केले. या काळात त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरु होती’. मार्व्हल युनिव्हर्समधील अनेक सहकलाकारांनी बोसमनला श्रद्धांजली वाहिली आहे. अवघ्या 43 व्या वर्षी त्याचं असे निघून जाणे सर्वांसाठी धक्कादायक होते.
ब्लॅक पँथरमध्ये बोसमनने साकारलेली King T’Challa ची भूमिका अनेकांच्या हृदयात घर करून गेली आहे. नुकतेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक स्पाइक ली (Spike Lee) यांच्या Da 5 Bloods या सिनेमात बोसमनने भूमिका साकारली होती. बोसमनचा जन्म साऊथ कॅरोलिनाच्या अँडरसन याठिकाणी जन्म झाला होता. त्याने 2003 मध्ये पहिल्यांदा टेलिव्हिजनमध्ये काम केले होते. थर्ड वॉचमधील एपिसोडमध्ये तो दिसला होता. 2013 साली 42 मध्ये त्याने महान बेसबॉल प्लेअर जॅकी रॉबीनसनची भूमिका साकारली होती. त्याने सर्वच भूमिकांना न्याय दिला होता.

)







