मुंबई, 16 ऑक्टोबर : सोशल मीडियावर सर्वत्र ‘बिग बॉस मराठी सीझन 4’ ची चर्चा पहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बिग बॉसचा खेळ रंजक होत चालल्याचं दिसतंय. नुकतंच झालेल्या बिग बॉस चावडीत महेश सरांनी घरातील कॅप्टनपासून बऱ्याच स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. त्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांनी त्यांची चूक दाखवून दिली. महेश सरांनी घेतलेल्या चावडीचा प्रेक्षकांनीही चांगलाच आनंद लुटला. अशातच घरात आज काय नवीन घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आज बिग बॉसच्या घरात महेश मांजरेकर नवा टास्क घेणार आहेत. याचा एक प्रोमो व्हिडीओही समोर आलाय. या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, महेश मांजरेकर स्पर्धकांना एक संधी देणार आहे ज्याने गद्दारी केली त्याला उखळीत घालून ठेचा. त्यामुळे स्पर्धक आता कोणाकोणावर आपली भडास काढणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
महेश मांजरेकरांच्या या संधीमुळे घरात तुफान राडे होणार यात काही शंका नाही. मात्र कोणी कोणासोबत गद्दारी केली हे प्रेक्षकांना पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. आज रात्री होणार भाग प्रेक्षकांचं फूल टू मनोरंजन करणारा असणार आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या घरात सध्या दुसरा आठवडा सुरू असून स्पर्धक गेली दहा दिवस एकत्र घरात राहत आहेत. दहा दिवसात स्पर्धकांची एकमेकांशी चांगलीच ओळख झाली आहे. स्पर्धक एकमेकांचे मित्र होऊ लागलेत, एकमेकांबरोबर गप्पा गोष्टी, शेअरिंग सुरू झाली आहे. स्पर्धक जितके एकमेकांबरोबर भांडत असतात तितकेच ते एकमेकांशी गप्पा, मजा, मस्ती करत असतात.