मुंबई, 18 ऑक्टोबर- ‘बिग बॉस’ 16’ च्या घरात जोरदार ड्रामा पाहायला मिळत आहे. शोचा दुसरा आठवडादेखील तितकाच वादग्रस्त राहिला. घरामध्ये राडे, मैत्री, प्रेम आणि एकेमकांची पोलखोल झालेली दिसून आली. काही सदस्यांच्या कुटुंबीयांनी बिग बॉसमध्ये येत त्यांना कोण लोक त्यांचा फायदा घेत आहेत हे दाखवून दिलं. आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला. यामध्ये सुंबुलच्या वडिलांचादेखील समावेश आहे. सुंबुलच्या वडिलांनी बिग बॉसच्या मंचावर येत शालिनला चांगलंच फटकारलं इतकंच नव्हे तर शोसाठी आपल्या मुलीचा वापर करुन घेत असल्याचा आरोपही त्याच्यावर लावला. दरम्यान त्यांनी टीनालासुद्धा खडेबोल सुनावले आहेत. बिग बॉसच्या घरात आल्यापासून शालिन भनौत आणि सुंबुल तौकीर यांच्यात छान बॉन्डिंग निर्माण झालं होतं. या दोघांमध्ये जवळीकता वाढत चालली होती. दरम्यान या दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या. सोशल मीडियावरदेखील या दोघांमध्ये रिलेशनशिप निर्माण होत असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु शालिन आणि सुंबुलमध्ये वयाचं मोठं अंतर आहे. शालिनचं यापूर्वी लग्न होऊन घटस्फोटदेखील झाला आहे. त्यामुळे या दोघांची जवळीकता बरीच चर्चेत आली होती. (हे वाचा: Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात रोमॅंटिक झाले अंकित-प्रियांका; लव्हबर्ड्सचा VIDEO VIRAL **)** दरम्यान बिग बॉसच्या घरात टीनाने शालिन आणि सुंबुलमध्ये काही आहे का असा प्रश्न शालिनला विचारला होता. त्यांनतर बिग बॉसच्या घरातदेखील हीच चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे सुंबुलच्या वडिलांनी शोमध्ये येत शालिन आणि टिनाची कानउघडणी करत, आपल्या लेकीला त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे घरात अगदी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यांनंतर आता शालिन आणि टीनामध्ये सुंबुलवरुन वादविवाद होताना दिसून येणार आहे. कॅप्टन्सी टास्क पूर्ण झाल्यानंतर सर्व सदस्यांना अशी नावे सांगण्याचा आदेश दिला ज्यांचं घरातील सहकार्य सर्वात कमी आहे. यावेळी सर्वांनी सुंबुल तौकीर खान आणि मान्या सिंगचं नाव घेतलं. विशेष म्हणजे सुंबुलचा मित्र असणाऱ्या शालिनने आणि टीनादेखील सुंबुलचं नाव घेतलं.
हा टास्क संपल्यानंतर शालिन टीनाजवळ आपण सुंबुलचं नाव घेतल्याबाबत खंत व्यक्त करतो. सर्वांनी सुंबुलचं नाव घेतलं मला खूप वाईट वाटत असल्याचं सांगतो. परंतु यावर टीना त्याला स्वतःला दोष देणं योग्य नसल्याचं सांगते. या सर्व चर्चेदरम्यान टीना आणि शालिनमध्ये खटके उडतात. तर दुसरीकडे सुंबुल आपल्या खेळामध्ये सक्रिय होतांना अद्यापही दिसून येत नाहीये. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटत आहे.