मुंबई, 12 सप्टेंबर: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉसचे लाखो चाहते आहे. प्रत्येक सीझनसाठी चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. अशातच बऱ्याच दिवसांपासून चाहते ‘बिग बॉस 16’ ची वाट पाहत आहेत. नुकताच या शोचा प्रोमो समोर आला. सलमान खान पुन्हा एकदा होस्ट म्हणून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. बिग बॉस 16 च्या पहिल्या प्रोमोमध्ये सलमान खान जबरदस्त अवतारात दिसत आहे. प्रोमो समोर येताच, पुन्हा एकदा बिग बॉसची सर्वात प्रसिद्ध जोडी सिदनाझ म्हणजेच सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची चर्चा तीव्र झाली आहे. कारण म्हणजे या प्रोमोच्या सुरुवातीलाच मागील सीझनमधील स्पर्धकांची झलक दाखवण्यात आली होती. या झलकमध्ये दिवंगत सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्या रोमँटिक क्षणांनाही दाखवण्यात आले. ‘15 वर्षांपासून बिग बॉसने सर्वांचा खेळ पाहिला आहे. यावेळी बिग बॉस आपला खेळ दाखवणार आहेत. सकाळ होईल पण चंद्र आकाशात दिसेल. गुरुत्वाकर्षण हवेत उडेल. घोडाही आता सरळ चालेल. कारण यावेळी बिग बॉस स्वतः खेळताना दिसणार आहे’. अशा कॅप्शनसह प्रोमो प्रदर्शित करण्यात आला.
बिग बॉस 16 मध्ये येणाऱ्या स्पर्धकांबद्दल सांगायचे तर, या शोमध्ये प्रभावशाली फैसल शेख, जन्नत जुबेर, पूनम पांडे, राजीव सेन, चारू असोपा आणि सुरभी ज्योती दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय बंगाली अभिनेत्री आणि तृणमृल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहॉंच्या नावाचाही चर्चा आहे. त्यामुळे बिग बॉस 16 च्या फायनल नावांचं गूढ कधी उघडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हेही वाचा - ‘काही गोष्टी कधीही बदलत नाहीत’; अभिषेक बच्चनची हृदयस्पर्षी POST चर्चेत दरम्यान, बिग बॉसच्या घरात काहीतरी वेगळं घडणार आहे, हे व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. ही पहिलीच वेळ असेल की स्पर्धकांसोबत बिग बॉस देखील त्यांच्या घरातील खेळ खेळेल. आजपर्यंत कोणीही बिग बॉस पाहिलेला नाही. अशा परिस्थितीत बिग बॉस कसा गेम खेळणार आणि काय नियम असणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.