मुंबई, 14 डिसेंबर: ‘टायटॅनिक’ आणि ‘द टर्मिनेटर’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीमुळे हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमेरून हे नाव जगप्रसिद्ध झालेलं आहे. ‘लार्जर दॅन लाइफ’ चित्रपट बनवण्यात कॅमेरून यांचा हातखंडा आहे. येत्या 16 डिसेंबर रोजी त्यांचा ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात झो सलडाना, एडी फाल्को, सॅम वर्थिंग्टन, जेमेन क्लेमेंट, केट विन्सलेट, सिगॉर्नी वीव्हर, स्टीफन लँग, क्लिफ कर्टिस, जोएल डेव्हिड मूर, सीसीएच पाउंडर अशी तगडी स्टारकास्ट आहे. हीच स्टारकास्ट चित्रपटाच्या पहिल्या भागात म्हणजेच ‘अवतार’मध्येही दिसली होती. 1900 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी पुन्हा एकदा जबरदस्त माइंड गेम खेळला आहे. ‘एशिया नेट न्यूज’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’चा पहिला भाग 2009 मध्ये रिलीज झाला होता. म्हणजे तब्बल 13 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात फार उत्सुकता आहे. अवतारचा दुसरा भाग रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी त्याचा पहिला भाग पुन्हा प्रेक्षकांसमोर आणला आहे. या वेळी तो चित्रपटगृहांऐवजी ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर पाहता येईल. प्रेक्षकांनी दुसरा भाग पाहण्यापूर्वी पहिला भाग पाहावा, जेणेकरून चित्रपटाची कथा त्यांच्या मनात पुन्हा घर करेल आणि दुसरा भाग बघताना त्याचा उपयोग होईल. हेही वाचा - Sai Tamhankar ने सुद्धा केला ट्रेंड फॉलो; फोटो पाहून पडाल प्रेमात चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होण्यास एवढा वेळ का लागला, असा प्रश्न जेम्स कॅमेरून यांना अनेकदा विचारण्यात आला आहे. याविषयी कॅमेरून यांनी सांगितलं, की बरेच दिवस ते चित्रपटाच्या कथेवर काम करत होते. दुसऱ्या भागात आधुनिक गोष्टी दाखवण्याच्या प्रयत्नात त्याच्या शूटिंगलाही वेळ लागला. त्यानंतर कोरोना महामारीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळपास आठ वेळा बदलण्यात आली. शेवटी आता 16 डिसेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. असं असेल ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’चं कथानक चित्रपट क्रिस्पी आणि लहान ठेवण्यासाठी, तो 2154च्या काळात सेट केला गेला आहे. या काळात पृथ्वीवरची नैसर्गिक साधनसंपत्ती संपुष्टात आलेली असेल. रिसोर्सेस डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशन (आरडीए) आता अल्फा सेंटॉरी स्टार सिस्टीममधल्या एक चंद्र असलेल्या पँडोरावर अनओबटेनियमचं उत्खनन करते आहे. पँडोराचं वातावरण नावी या जमतीनं वसवलेलं आहे. पॅराप्लेजिक मरीन जेक सुलीची भूमिका करणारा मुख्य अभिनेता सॅम वर्थिंग्टनला पँडोराला पाठवलं जातं. पँडोरावर असताना जेक नियमांचं उल्लंघन करतो आणि नेतिरीला (झो सलडाना) भेटल्यानंतर नावी वंशात सामील होतो. हा चित्रपट जगभरातल्या 160 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. समीक्षकांचं म्हणणं आहे, की हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटानं आतापर्यंत 10 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी फक्त भारतातली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.