मुंबई, 25 जानेवारी: सध्या सोशल मीडियावर 'बेफाम' या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या पोस्टरमध्ये पाठमोरी दिसणारी व्यक्ती नक्की कोण आहे? यासाठी चाहत्यांकडून अनेक तर्क वितर्क लावले जात होते. आता या प्रश्नाचं उत्तर चाहत्यांना मिळालं आहे. कारण 'बेफाम' चित्रपटातील ही जोडी आता सर्वांसमोर आली आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सखी गोखले यांची मुख्य भूमिका असलेला बेफाम येत्या 26 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्री सखी गोखले यांची उत्तम लव्हेबल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ आणि सखीची ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे. या चित्रपटाची कथा चित्रपटाच्या नावाप्रमाणेच 'बेफाम' आहे. सिद्धार्थला यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सखीची असलेली साथ, तिची मैत्री, प्रेम आणि विश्वास या सर्व भावनांना एकत्रित गुंफणारी या चित्रपटाची कथा आहे. या फ्रेश जोडीला 'अमोल कागणे स्टुडिओज'ने 'बेफाम' या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रित आणलं असून हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'हलाल', 'लेथ जोशी', 'परफ्युम', 'वाजवूया बँड बाजा' या यशस्वी चित्रपटांच्या निर्मितीनंतर अमोलचा 'बेफाम' हा चित्रपट आगळा वेगळा विषय हाताळणारा आहे. अमोल कागणे यांनी निर्मित केलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शक कृष्णा कांबळे यांनी केलं आहे. तसंच निर्माता मिथिलेश सिंग राजपुतने या चित्रपटाकरिता एक्झिक्युटिव्ह आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसरची भूमिका पार पाडली आहे. या चित्रपटाची कथा विद्यासागर अद्यापक यांनी लिहिली आहे. तर अमित राज आणि मंदार खरे यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. तसंच गायक क्षितिज पटवर्धन यांनी आपल्या संगीत लहरींच्या जोरावर या चित्रपटातील गाणी एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवली आहेत.
एकंदरीतच हा चित्रपट म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या असंख्य संकटांना निडरपणे भिडण्याची उर्मी देणारा चित्रपट आहे. अपयशाने खचलेलं असतानाही यशाच्या शिखराकडे वाटचाल करण्यासाठी बळ देणारा 'बेफाम' हा एक सकारात्मक चित्रपट आहे. येत्या 26 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.