मुंबई, 27 जुलै : संपूर्ण महाराष्ट्रात बाईपण भारी देवा या सिनेमाला पसंती मिळाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सिनेमा आवडल्याचं दिसत आहे. 80 वर्षांच्या आजी देखील थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी पोहोचल्या आहेत. कोल्हापूरातील प्रेक्षकांचा उत्साह पाहण्यासाठी गेलेल्या सिनेमाच्या टीमला 80 वर्षांच्या आजी भेटल्या. आजी देखील सिनेमाच्या फॅन होत्या. कलाकारांना भेटताच आजींनी त्यांच्याबरोबर फुगडी घालत आनंद साजरा केला. मराठी सिनेमाला पुन्हा एखदा यशाच्या शिखरावर पोहोचवणारा बाईपण भारी देवा हा सिनेमा सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतोय. केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या सिनेमानं 65 कोटींचा टप्पा पार केला आहे. 24 दिवसात अफाट यश मिळवणारा हा पहिलाच मराठी सिनेमात आहे. 6 बहिणींची गोष्ट सांगणाऱ्या या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते आणि दीपा परब यांनी प्रमुख भुमिका साकारल्या आहेत. सहा बहिणींनी सिनेमात कल्ला केलाय. सिनेमा रिलीज झाला असला तरी सिनेमाचं प्रमोशन काही थांबलेलं नाही. सिनेमाचं यश साजरं करण्यासाठी सिनेमाची संपूर्ण टीम महत्त्वाच्या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाली आहे. नुकतंच सिनेमाच्या टीमनं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. हेही वाचा - Kedar Shinde : ‘मला राजकारणात जायचं आहे पण…’; दिग्दर्शक केदार शिंदे स्पष्टच बोलले
अभिनेत्री सुकन्या मोने यांनी सिनेमात तर कल्ला केलाच आहे. पण सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान देखील त्या कल्ला करताना दिसत असतात. कोल्हापूरात सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या 80 वर्षांच्या आजीबरोबर बाईपण भारी देवाच्या हुकस्टेपवर सुकन्या यांनी ठेका धरला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, गुलाबी रंगाची काष्ठीपातळ( नऊवारी साडी ) नेसलेल्या आजी, डोक्यावर पदर घेऊन मोठ्या उत्साहात सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये आल्यात. आजींचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. सुकन्या मोनेंचा हात धरून आजींनी थेट फुगडी घालायला सुरूवात केली. दोघींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.