मुंबई, 07 फेब्रुवारी: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी मुंबईच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दाखल झाले होते. लता मंगेशकर यांच्या निधनाने त्यांचं कुटुंब, चाहते आणि संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. बहिणीच्या जाण्यानंतर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांच्यासोबतचा बालपणीचा फोटो शेअर करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आशा भोसले यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोन्ही बहिणी एकत्र दिसत आहेत. हा फोटो शेअर करत आशा भोसले यांनी लिहिले की, दीदी आणि मी, बालपणीचे काय दिवस होते. आशा भोसले यांच्या या पोस्टवर चाहते दोन्ही बहिणींवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तसंच लता मंगेशकर यांना आदरांजली वाहत आहेत.
याशिवाय आशा भोसले यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्टही शेअर केली आहे, ज्यामध्ये असं लिहिलं आहे की, देशात दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. लतादीदींच्या निधनामुळे सुन्न झाल्या आशाताई पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: लतादीदींना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी दीदींच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. लतादीदी यांच्या लहान बहीण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पंतप्रधान मोदींनी हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर आशाताईंनी देखील त्यांना हात जोडून वंदन केलं. शिवाजी पार्कातील त्या क्षणांचे अनेक फोटो आता समोर आले आहेत. त्यातील आशाताई यांचे फोटो खरंच खूप मनाला चटका लावणारे आहेत. आपली मोठी बहीण, जी देशाची गानसम्राज्ञी होती, तिचं आज निधन झालंय, ती आज आपल्यात नाही, या विचारांनी आशाताईंची झालेली अवस्था ही फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत होती. आशाताई आतून खचल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर जाणवताना दिसलं. आशाताई आपल्या मोठ्या बहिणीच्या निधानाने सुन्न झालेल्या होत्या. लता मंगेशकर यांच्यावर गेल्या 27 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. या दरम्यान त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांची प्रकृती बरी होण्याच्या मार्गावर होती. पण शनिवारी अचानक पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर लगेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आशाताई भोसले आणि आणखी काही दिग्गजांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जावून लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आशाताई जेव्हा शनिवारी रात्री रुग्णालयातून बाहेर पडल्या तेव्हा त्यांनी लतादीदींची प्रकृती स्थिर असल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. त्यावेळी आशाताई यांच्या चेहऱ्यावर दीदींविषयीची असणारी काळजी आणि आशावाद स्पष्टपणे जाणवत होता. लतादीदींनी आपल्या आयुष्याची शंभरी पार करावी, अशी देशभरातील लाखो चाहत्यांची अपेक्षा होती. पण रविवारी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास लतादीदींची प्राणज्योत मालवली.