मुंबई, 02 मे : महाराष्ट्र शाहीर हा बहुचर्चित सिनेमा 28 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची भरगोस प्रतिसाद मिळवला. सिनेमा अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत आहे. महाराष्ट्र शाहीर निमित्तानं महाराष्ट्राचं लोकसंगीत, लोककला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या सिनेमानं तिकिटबारीवर देखील चांगलं यश मिळवल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान सिनेमाचं दमदार प्रमोशन देखील करण्यात आलं. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरही सिनेमाचं दणकून प्रमोशन सुरू आहे. स्वत: अभिनेता अंकुश चौधरीनं मैदानात उतरत थेट सिनेमाची तिकिटं विकली आहेत. मुंबईतील दादरमधील एका प्रसिद्ध चित्रपटगृहाच्या तिकिट खिडकीवर जाऊन अंकुशनं स्वत: तिकिट विक्री केली. याचा व्हिडीओ अंकुशनं शेअर केला आहे. या व्हिडीओ चाहत्यांची पसंती मिळाली असून अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. दादरमधील चित्रा सिनेमा या थिएटरमध्ये जाऊन अंकुशनं तिकिट विक्री केली. लालबाग, परळ आणि दादरमध्ये राहणाऱ्या प्रत्येकासाठी ही थिएटर फार जवळचं आहे. स्वत: अंकुश चौधरी देखील परळ भागात राहिल्यानं त्याच्यासाठी देखील नक्कीच हा फार सुखद अनुभव असेल. हेही वाचा - ‘मराठी सिनेमा संपवला जातोय’, TDMला स्क्रीन मिळेना; दिगदर्शक, कलाकारांनी जोडले हात
शुक्रवार शनिवारी रविवार आणि सोमवार महराष्ट्र दिनानिमत्तानं सुट्टी असल्यानं प्रेक्षकांनी थिएटरमध्ये चांगलीच गर्दी केली. चित्रा सिनेमा सुरू झाल्यानं अनेक प्रेक्षक तिकडे वळले आणि तिकिट खिडकीवर लाडक्या अभिनेत्याला पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. थिएटर बाहेर तिकिट घेऊन अंकुशला भेटण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे.
चित्रा सिनेमा मागील काही वर्ष बंद करण्यात होतं. त्या ठिकाणी नवीन डेव्हलपमेंट होणार आहे अशा चर्चा होत्या. मात्र अनेक वर्षांनी चित्रा सिनेमा पुन्हा एकदा नव्या रूपात सुरू करण्यात आलं आहे. चित्रा सिनेमा रिनोव्हेट करून प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा खुलं करण्यात आलं आहे. अनेकांनी त्यांच्या आयुष्यातील पहिला सिनेमा चित्रा टॉकिजला पाहिला असेल. त्याच्यांसाठी चित्रा टॉकीज पुन्हा एकदा सुरू होणं हा फार सुखद धक्का असणार आहे.