मुंबई,19 मे- 'जुनं ते सोनं' आपल्याकडे अशी म्हण आवर्जून वापरली जाते. आज याच गोष्टीचा प्रत्यय अनुभवायला मिळत आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील सदाबहार चित्रपट 'आनंद'
(Anand Movie) आता पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुपरस्टार राजेश खन्ना, बिग बी अमिताभ बच्चन, रमेश देव अभिनीत 'आनंद' चित्रपटाचा रिमेक
(Remake) बनविला जात आहे. नुकतंच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
'आनंद' या चित्रपटाचे मूळ निर्माते एन.सी. सिप्पी यांचा नातू समीर राज सिप्पी आणि निर्माता विक्रम खाखर या चित्रपटाच्या रिमेकची निर्मिती करत आहेत. याबाबत बोलताना निर्माते विक्रम खाखर म्हणतात, ''आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक स्तरावर शोधण्यापेक्षा आपल्या क्लासिकच्या खजिन्यात शोधल्यास आनंद चित्रपटासारखे अनेक मौल्यवान रत्ने हाती लागतील. कोव्हीड नंतरच्या काळात आनंद चित्रपटाचा रिमेक जीवनाच्या मूल्यांवर अधिक प्रकर्षाने प्रकाश टाकेल''.
तर याबाबत बोलताना दुसरे निर्माता समीर सिप्पी यांनी म्हटलं, '' अशा कथा नवीन पिढीला सांगणे त्यांच्या समोर मांडणे आवश्यक आहे, पुढे त्यांनी म्हटलं, “मूळ चित्रपटाची संवेदनशीलता आणि संलग्न भावना लक्षात ठेवून, मला वाटले की सध्याच्या पिढीला याची गरज आहे. अशा अनेक कथा पुन्हा सांगायाला हव्यात ज्या आज खूप प्रासंगिक आहेत आणि विशेषत: जेव्हा चांगल्या आशयाची खूप भूक आहे'.
'आनंद'-
'आनंद' हा चित्रपट 1971 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आता तब्बल 51 वर्षांचा काळ लोटला आहे. तरीसुद्धा हा चित्रपट सदाबहार आहे. या चित्रपटात सुपरस्टार राजेश खन्ना, बिग बी अमिताभ बच्चन, रमेश देव, सीमा देव यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या सर्व कलाकारांनी आपल्या अप्रतिम कलेच्या जोरावर हा सिनेमा जिवंत केला होता.या चित्रपटातील 'बाबूमोशाय' 'जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही' यांसारखे डायलॉग आजरामर झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.