मुंबई, 21 मे: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर किंवा टेलिव्हिजन सर्वत्र एकच नाव गाजतंय ते म्हणजे चंद्रा चंद्रा आणि फक्त चंद्रा (Chandra) प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शिक आणि विश्वास पाटील (Vishwas Patil) यांच्या कांदबरीवर आधारीत चंद्रमुखी (Chandramukhi Marathi Movie) हा सिनेमा सिनेमागृहात धुमशान घालतोय. अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सिनेमात मुख्य भूमिकेत असून तिने सादर केलेली आणि गायिका श्रेया घोषालने (Shreya Ghoshal) गायलेली चंद्रा ही लावणी (Chandra Lavni Song) प्रत्येकाच्या मनात घर करुन आहे. जिथे जाऊ तिथे केवळ चंद्रा हे गाणं ऐकू येत आहे. गाणं रिलीज झाल्यापासूनच गाण्याला तूफान प्रतिसाद मिळत आला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन चार आठवडे झाले असताना सिनेमातील चंद्रा गाण्याने यू ट्यूबवर 2 कोटी व्यूजचा टप्पा पार केला आहे. जवळपास गेली दोन महिने हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असून आजही या गाण्याचा सिलसीला कायम आहे. चंद्रा या गाण्याचे शब्द लेखक कवी गुरू ठाकूर (Guru Thakur) यांनी लिहिले असून प्रसिद्ध संगितकार जोडी अजय-अतुल (Ajay Atul Musical) यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. गाण्यावर अभिनेत्री अमृता खानविलकरने चंद्रा या बहारदार गाण्यावर सुंदर लावणी सादर केली आहे. अमृता खानविलकर ही सुंदर डान्सर आहेच मात्र या गाण्यात भावांग सादर करण्याचा प्रयत्न अमृताने केलेला पाहायला मिळतो. नृत्य दिग्दर्शिका दिपाली विचारे यांनी या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे.
चंद्रा हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गाण्याला लाभलेलं अजय अतुल यांचं संगीत. ढोलकीची थाप, तालाची हुन्नर, ढोलकीच्या तालावर रंगलेल्या ठसकेबाज लावणीच्या सुरांनी हे गाणं ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या कानात घुमू लागलं. श्रेया घोषलच्या आवाजने तर गाण्याला चार चांद लावलेत. या सगळ्याची गुंफण घालून अमृताने सादर केलेली चंद्रा ही खडी लावणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. चंद्रा या गाण्यावर केवळ मराठी प्रेक्षकच नाही तर इतर राज्यातून अनेक प्रेक्षकांनी चंद्राला प्रेम दिलं आहे. चंद्रा या गाण्याचं कमेंट सेक्शन लाखो कमेंटनी भरलं आहे. एका चाहत्यानं म्हटलंय, ‘मी पंजाबी आहे तरीही मला चंद्रा हे गाणं प्रचंड आवडतं’. तर दुसऱ्या चाहत्यानं म्हटलंय, ‘चंद्रा गाण्यामुळे आम्हाला लावणी प्रकार कळला, महाराष्ट्राची संस्कृती कळली’. सोशल मीडियावरही आजही चंद्रा गाण्यावर केलेले रिल्स व्हायरल होत आहेत. चंद्रमुखी या सिनेमात अभिनेत्री अमृतासह अभिनेता अदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, प्राजक्ता माळी,समीर चौघुले आदी कलाकार आहेत.