मुंबई, 5 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. भारतात तिसरी लाट आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. दरम्यान, बी टाऊनचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या घरी कोरोनाने एन्ट्री केली आहे. स्टाफ मेंबर्समधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी अमिताभ बच्चन यांच्या घरी काम करणाऱ्या एकूण 31 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी 11 जुलैला अमिताभ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना नानावटी या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांनंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अमिताभ यांची नात आराध्याला देखील कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबतच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अमिताभ यांच्या ‘द इंटर्न’ या आगामी चित्रपटाची त्यांचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.