मुंबई,18 मे- बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत आलिया भट्ट चं नाव सर्वात प्रथम येतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. गेल्या काही दिवसांत आलियाने अफाट प्रसिद्धी मिळवली आहे. बॉलिवूडच नव्हे तर आलियाने साऊथपासून हॉलिवूडपर्यंत आपला डंका वाजवला आहे. कधी आपल्या अभिनयामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे आलिया भट्ट नेहमीच चर्चेत असते. या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर देशातच नाही तर परदेशातही आपला ठसा उमटवला आहे. आलियाने या महिन्याच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेट गालामध्ये पदार्पण करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आणि तिच्या लूकने चाहत्यांनाही प्रभावित केलं होतं. दरम्यान एका मोठ्या इटालियन लक्झरी फॅशन हाऊसने पहिली भारतीय ब्रँड अँबॅसिडर म्हणून अभिनेत्री आलिया भट्टची निवड केली आहे. त्यानंतर आता अभिनेत्री नुकतंच सोलमधील ग्योंगबोकगुंग पॅलेसमध्ये गुच्चीच्या क्रूझ 2024 शोमध्ये सहभागी होताना दिसली.आलियाने स्वतः आपल्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो समोर येताच व्हायरल होत आहेत. येथे अभिनेत्रीने अशी बॅग घेतली होती. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. (हे वाचा: 11ब्लॉकबस्टर चित्रपटांनी बनवली जोडी, करिश्माने अचानक गोविंदासोबत काम करणं केलं बंद,काय होतं कारण? ) आलियाने या इव्हेंटमध्ये कटआउट डिटेल असलेला ब्लॅक गुच्ची शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. या लुकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिने गुच्चीची हील्ससुद्धा घातली होती. पण, अभिनेत्रीच्या ड्रेसक्षा तिच्या बॅगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सांगायचं तर, या इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या आलिया भट्टने आपल्या हातात एक पारदर्शक हँडबॅग घेतली होती. आणि ही हँडबॅग पूर्णपणे रिकामी होती. एका इतक्या मोठ्या फॅशन इव्हेंटमध्ये रिकामी बॅग घेऊन गेल्यामुळे अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट करत युजर्सनी रिकामी बॅग घेऊन जाण्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरुन अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोलही केलं आहे. नेहमीच आपल्या फॅशनने चाहत्यांना आश्चर्यचकित करणाऱ्या आलिया भट्टने यावेळी आपल्या रिकाम्या बॅगने चाहत्यांना नाराज केलं आहे. पण, आलियाच्या या रिकाम्या पारदर्शक बॅगची किंमत तुम्हाला माहीत आहे का? इव्हेंटमध्ये आलिया भट्टने घेतलेल्या बॅगची किंमत 2 लाख 43 हजार रुपये इतकी आहे.
गुच्चीच्या पारदर्शक हँडबॅग्ज अनेक बड्या फॅशनप्रेमींना आवडते. आत्तापर्यंत अनेक बड्या अभिनेत्री या बॅग घेऊन जाताना दिसल्या आहेत. अभिनेत्रीच्या गुच्ची बॅगशिवाय तिच्या सँडलबद्दल बोलायचं झालं तर तिने परिधान केलेल्या सँडलची किंमतदेखील कमी नव्हती. गुच्ची इंटरलॉकिंग जी स्टड सँडलची किंमत सुमारे 1.06 लाख आहे. अभिनेत्रीचा हा महागडा लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे.