मुंबई, 02 नोव्हेंबर : शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमे सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच हर हर महादेव हा मराठीतील पहिला बहुभाषिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी वेडात मराठी वीर दौडले सात या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 2023च्या दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मराठीतील दुसरा बहुभाषिक सिनेमा असून मराठीसह हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता खिलाडी अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा करण्यात आली. सिनेमाची पहिली झलक पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'हा सिनेमा सुपरहिट होईल', असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
वेडात मराठी वीर दौडले सात या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सात वाघांची गोष्ट दाखवण्यात येणार आहेत. टेलिव्हिजन आणि मराठी सिनेसृष्टीतील सात तगडे कलाकार या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. बिग बॉस फेम अभिनेता विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, हार्दीक जोशी, सत्या मांजरेकर, विराट मडके आणि प्रवीण तरडे हे कलाकार सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. जिवाजी महाल, तुळजा, मल्हारी, सूर्याजी, चंद्राजी यासह शिवरायांच्या सात मावळ्यांची यशोगाथा सिनेमा पाहायला मिळणार आहे.
अक्षय कुमारनं याआधी मराठी सिनेमांची निर्मिती केली आहे. मात्र अक्षय पहिल्यांदा मराठी सिनेमात काम करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल अक्षय कुमार म्हणाला, 'शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ स्वप्न पूर्ण झालं. महाराजांची भूमिका साकारायला मिळणं ही माझी मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण प्रयत्न करणार आहे'.
अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हा आतापर्यंतचा बिग बजेट सिनेमा ठरला आहे. जवळपास 7 वर्ष महेश मांजरेकर या सिनेमावर काम करत आहेत. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या सिनेमानंतर महेश मांजरेकरांनी अनेक वर्षांनी पुन्हा एकदा महाराजांवर आधारीत सिनेमा तयार करण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. हा सिनेमा देखील सुपरहिट होईल यात काही शंका नाही.
सिनेमात अभिनेता प्रविण तरडेचा भारदस्त अभिनय पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. तर बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमधील तिन स्पर्धक मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अभिनेता विशाल निकम, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यानंतर महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news