मुंबई, 05 जानेवारी: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुंबईत भेट घेतली. त्याने यूपीमधल्या आगामी फिल्म सिटीबाबत चर्चा केली. योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर असताना अक्षयने त्यांची भेट घेतली. एका हॉटेलमध्ये त्यांची बैठक 35 मिनिटं चालली होती, असं उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या संदर्भातलं वृत्त 'इंडिया टीव्ही'ने दिलं आहे.
अक्षय कुमारने आदित्यनाथ यांना त्याचा अलीकडेच प्रदर्शित झालेला 'राम सेतू' हा चित्रपट पाहण्याची विनंती केली. तसंच उत्तर प्रदेश सरकार विकसित करत असलेल्या उत्तर प्रदेश फिल्म सिटीच्या उद्घाटनाची वाट आपण पाहत असून, ही फिल्म सिटी हिंदी फिल्म इंडस्ट्रीसाठी नवीन पर्याय उपलब्ध करून देईल, असंही तो म्हणाला. याबाबत प्रसिद्धीपत्रकात माहिती देण्यात आली आहे.
सामाजिक जाणीव निर्माण करण्यात, जनजागृती करण्यात आणि सामाजिक आणि राष्ट्रीय कामांना चालना देण्यासाठी चित्रपट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असं मत योगी आदित्यानाथ यांनी व्यक्त केलं. चित्रपट निर्मात्यांनी विषय निवडताना सामाजिक आणि राष्ट्रीय जाणिवेच्या मुद्द्यांना महत्त्व दिलं पाहिजं, असंही ते म्हणाले. त्यांचं सरकार लवकरच सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टमसह नवीन चित्रपट धोरण राबवणार आहे. उत्तर प्रदेशची फिल्म सिटी जागतिक दर्जाची असेल, असंही ते या वेळी म्हणाले.
अक्षय कुमार आदित्यनाथ यांना म्हणाला, की नव्या फिल्म सिटी प्रोजेक्टबद्दल भारतीय चित्रपट उद्योगात मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. अनेक मोठी प्रॉडक्शन हाउसेस, निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यूपीमधली फिल्मसिटी सुरू होण्याची वाट पाहत आहेत. यूपीमध्ये जागतिक दर्जाची फिल्म आणि इन्फोटेनमेंट सिटीच्या विकासामुळे चित्रपट व्यवसायात असलेल्यांना त्यांच्या प्रकल्पांची आखणी करण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध होईल.
अक्षयने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी 'रामसेतू'च्या स्क्रिप्टसाठी केलेलं संशोधन आणि तयारीबद्दल चर्चा केली. तसंच आदित्यनाथ यांनी त्याचा हा चित्रपट एकदा नक्की पाहावा, अशी विनंतीही अक्षयने त्यांना केली. त्यावर जनजागृती करण्यात सिनेमाचा मोठा वाटा आहे आणि चित्रपट निर्मात्यांनी विषय निवडताना सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांना महत्त्व दिले पाहिजे, असं योगी आदित्यनाथ यांनी नमूद केलं. सध्या या दोघांच्या भेटीची जोरदार चर्चा होत आहे. आदित्यनाथ यांनी अक्षयला उत्तर प्रदेशला भेट देण्याचं आमंत्रणही दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Yogi Aadityanath