मुंबई, 24 मार्च- मनोरंजनसृष्टीत काम करताना अनेकवेळा भयानक स्टंट करावे लागतात. काही कलाकार यासाठी बॉडी ड्बलचा वापर करतात. तर काही स्वतःच हे स्टंट करतात. या यादीमध्ये खिलाडी अक्षय कुमारचाही समावेश होतो. अक्षय कुमार बॉडी डबलशिवाय चित्रपटाच्या सेटवर धोकादायक ऍक्शन सीक्वेन्स आणि स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, स्कॉटलंडमध्ये त्याच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली आहे. टायगर श्रॉफसोबत ऍक्शन सीनचं शूटिंग करत असताना अक्षय कुमारचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अक्षय कुमार जरी जखमी झाला असला, तरी त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याने तो शूटिंग सुरुच ठेवणार आहे. स्पेशल ऍक्शन सीक्वेन्सचं शूटिंग सध्या थांबवण्यात आलं आहे. परंतु अक्षय क्लोज-अप शॉट्ससह शूटिंग सुरु ठेवणार आहे. (हे वाचा: Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाने केला खाजगी आयुष्यातील ‘त्या’ गोष्टींबाबत खुलासा, वाचून सर्वच चकित ) हिंदुस्तान टाईम्सने सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “अक्षय कुमार टायगर श्रॉफसोबत एका ऍक्शन सीनचं शूटिंग करत होता. दरम्यान एक विशेष स्टंट करताना त्याला दुखापत झाली आहे. सध्या त्याच्या गुडघ्यावर ब्रेसेस आहेत. स्कॉटलंडमधील शूटिंग वेळेवर पूर्ण व्हावं म्हणून अक्षय क्लोज-अप्ससह शूट करत आहे. मात्र सध्या शूटचा महत्वाचा ऍक्शन भाग थांबवण्यात आला आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये अक्षय आणि टायगरशिवाय सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शूटींगसाठी स्कॉटलंडला रवाना होण्यापूर्वी टीमने मुंबईत त्यांच्या पहिल्या शेड्यूलचं शूटिंग पूर्ण केलं आहे. ‘टायगर जिंदा है’, ‘सुलतान’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘भारत’ आणि ‘गुंडे’ सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट 1998 मध्ये आला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, गोविंदा यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केलं होतं. हा चित्रपट त्याकाळात चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा आता सिक्वेन्स येत आहे. यामध्येच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची जोडी दिसणार आहे.