मुंबई, 28 एप्रिल- मनोरंजनसृष्टीत असे काही कलाकार आहेत, जे कोणत्याही गोष्टीवर आपले परखड मत व्यक्त करत असतात. अभिनेता अजय देवगनसुद्धा नेहमीच आपल्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखला जातो. नुकतंच बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) आणि कन्नड अभिनेता किच्चा सुदीप (Kichcha Sudeepa) राष्ट्रभाषेवरून आमने-सामने आले आहेत. किच्चा सुदीपच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत अजयने सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘RRR’ आणि ‘KGF Chapter 2’ च्या तुफान यशानंतर, कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप एका कार्यक्रमात पॅन इंडियन चित्रपटांबद्दल बोलताना म्हणाला, “हिंदी आता राष्ट्रभाषा नाही.” यावर अजयने आपलं मत व्यक्त केलं आहे. यासर्व प्रकरणावर अभिनेता अजय देवगनने एक ट्विट केलं आहे. अजयने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “किच्चा सुदीप माझ्या भावा, तुमच्या मते जर हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन." अजयच्या या ट्विटवर किचा यांनीही आता आपले स्पष्टीकरण दिले आहे.
किच्चा सुदीपने अजय देवगनच्या ट्विटला उत्तर देताना लिहिलं आहे, “सर, मला देशातील प्रत्येक भाषेवर प्रेम आणि आदर आहे. मला हा विषय इथेच संपवायचा आहे. मी म्हटल्याप्रमाणे या ओळी पूर्णपणे संदर्भाबाहेर आहेत.तुमच्यावर नेहमी प्रेम करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. मला आशा आहे कि पुन्हा लवकरच भेटूया."
किच्चा सुदीपने पुढे ट्विटमध्ये लिहिलं, “नमस्कार अजय देवगन सर… आशा आहे की हे तुमच्यापर्यंत पोहोचले आहे की मी ज्या संदर्भात बोललो ते पूर्णपणे वेगळं आहे. मी असे विधान का केले यावर आपण भेटल्यावर वैयक्तिक चर्चा करु. दुखावण्याचा, भडकविण्याचा देण्यासाठी किंवा वाद सुरू करण्याचा माझा हेतू नव्हता. मी हे का करू सर?" किच्चा सुदीपने पुढील ट्विटमध्ये लिहिलं, “आणि अजय सर… तुम्ही हिंदीत लिहिलेलं ट्विट समजलं आहे. कारण आपण सर्वांनी हिंदीचा आदर केला आहे.. प्रेम केलं आहे आणि शिकलं आहे. काहीच प्रॉब्लेम नाही सर, पण माझा प्रतिसाद कन्नडमध्ये टाईप झाला तर काय होईल याचा विचार करत होतो.!! आम्ही पण भारतातीलच नाही का सर?"
त्यांनतर पुन्हा अजय देवगननेही किच्चा सुदीपच्या या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिलंय, “हाय किच्चा, तू एक चांगला मित्र आहेस. गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद. मी नेहमीच फिल्म इंडस्ट्री एक मानली आहे. आम्ही सर्व भाषांचा आदर करतो. कदाचित भाषांतरात काहीतरी चुकलं असावं’. सध्या सोशल मीडियावर या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या ट्विटची चर्चा सुरु आहे.

)







