नवी दिल्ली, 20 डिसेंबर - जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) दिल्लीतील लोकनायक भवन येथे ईडीसमोर हजर झाली आहे. यापूर्वी ईडीने ऐश्वर्या रायला दोनवेळा समन्स बजावला होता. तिने हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. आज अखेर ती दिल्लीत ईडी कार्यालयात दाखल झाली आहे. तिची चौकशी सुरू आहे. इतकेच नव्हे तर लवकरच तिचे सासरे लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांनाही ईडीकडून समन्स पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील प्रमुख व्यक्तींची नावे आहेत. या लोकांवर करचुकवेगिरीचे आरोप आहेत. याबाबत कर अधिकारी तपास करत आहेत. पनामा पेपर्स प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. या प्रकरणात महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही ईडी कार्यालयात पोहोचला होता. त्याने ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रेही दिली आहेत
Aishwarya Rai Bachchan appears before ED in Delhi for questioning in 'Panama Papers' FEMA case: Officials
— Press Trust of India (@PTI_News) December 20, 2021
काय आहे पनामा पेपर्स प्रकरण? 2016 मध्ये, ब्रिटेनमध्ये पनामाच्या लॉ फर्मचे 11.5 कोटी टॅक्स डॉक्युमेंट लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारताबद्दल बोलायचे झाले तर जवळपास 500 जणांची नावे समोर आली होती. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. यापैकी तीन बहामासमध्ये, तर एक व्हर्जिन आयलंडमध्ये होती. या 1993 मध्ये तयार करण्यात आल्या. या कंपन्यांचे भांडवल 5 हजार ते 50 हजार डॉलर्स दरम्यान होते, परंतु या कंपन्या त्या जहाजांचा व्यवसाय करत होत्या, ज्यांची किंमत कोट्यावधी होती.