मुंबई, 14 सप्टेंबर : भारतात बाहुबली अशी ओळख अभिनेता म्हणजेच प्रभास. बाहुबलींनंतर प्रभासने अतिशय मोजकेच चित्रपट केले आहेत. पण त्यातील त्याच्या भूमिका फारशा गाजल्या नाहीत. आता प्रभास पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष' असं या चित्रपटाचं नाव असून हा रामायणावर आधारित असणारा सिनेमा आहे. या चित्रपटांचीही घोषणा झाल्यापासून याबद्दल सर्वत्र चर्चा आहे. आधीच प्रभासचा सिनेमा त्यात रामायणावर आधारित असल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रदर्शनापूर्वीच क्रेझ निर्माण झाली आहे. या 'आदिपुरुष' चित्रपटाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असताना आता या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'आदिपुरुष' या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या नवरात्रीत म्हणजेच 3ऑकटोबर रोजी या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित होणार आहे. सध्या जिकडेतिकडे याविषयीच चर्चा आहे. बाहुबली सारखाच 'आदिपुरुष' हा भव्यदिव्य सिनेमा असणार आहे. सुपरस्टार प्रभास या चित्रपटात भगवान रामच्या भूमिकेत झळकणार असून क्रिती सेनन आणि सनी सिंग हे कलाकार दिसणार आहेत. तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत 'आदिपुरुष'चे दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी याआधी लोकमान्य' हा मराठी तर तान्हाजी' या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर 3ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित या चित्रपटाचा टीझर 'दसर्या'च्या दोन दिवस आधी रिलीज होत आहे. गंमत म्हणजे यावेळी प्रभास दिल्लीत 'दसरा' साजरा करताना दिसणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीतील लवकुश रामलीला समिती लाल किल्ल्याच्या मैदानावर अयोध्येतील राममंदिराची थीम असलेला सेट बनवणार आहेत. प्रभास यावर्षी ५ ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. प्रभासच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
'आदिपुरुष'चे शूटिंग खूप आधी संपले आहे. हा एक 3D चित्रपट असून VFX चे काम चालू होते. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. पण रिलीजनंतर हा सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणे करेल यात शंका नाही. आता चित्रपटाचा टिझर पाहण्यासाठीच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bahubali, Bollywood actor, Entertainment, Prabhas