मुंबई, 16 ऑक्टोबर : टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली टक्कर हिने आत्महत्या केली आहे. इंदूर येथील राहत्या घरी वैशालीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अचानक समोर आलेल्या या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणी अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच तिची शेवटची सोशल मीडिया पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. मृत्यूच्या 5 दिवसांपूर्वी वैशाली टक्करने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा एक मजेदार व्हिडिओ होता. यामध्ये वैशाली म्हणताना दिसत आहे ‘बेबी, मी तुझ्यासाठी एक गाणं गाऊ?’ यानंतर ‘दिल, जिगर, नजर काय आहे मी तुझ्यासाठी जीवही देईल’ हे गाणे म्हणते. इन्स्टाग्रामवर वैशालीचा हा मजेदार व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली टक्कर गेल्या एक वर्षांपासून इंदोरमध्ये राहत होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती समोर येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांना वैशालीच्या मृतदेहा शेजारी सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे. वैशाली टक्कर आत्महत्येप्रकरणी तेजाजी नगर पोलीस ठाणे तपास करत आहेत. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असल्याने लवकरच या घटनेचा उलघडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वैशालीने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला होता आणि ती पहिल्याच मालिकेतूनच लोकप्रिय झाली. यानंतर त्याला ‘ससुराल सिमर का’ मधून ओळख मिळाली. छोट्या पडद्यावर आपली छाप सोडणाऱ्या वैशालीने ‘मनमोहिनी’, ‘सुपर सिस्टर्स’, ‘विश आणि अमृत’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.