मुंबई, 25 सप्टेंबर : अभिनेता संतोष जुवेकरने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. संतोष जुवेकर कोणत्या न कोणात्या कारणावरुन नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. अशातच यावेळी संतोष एका स्पेशल कारणामुळे चर्चेत आला आहे. संतोष लवकरच लग्न करणार असल्याचं समोर येत आहे. संतोषने शेअर केलेल्या नव्या पोस्टमुळे तो लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेता संतोष जुवेकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलंय की, मित्रांनो अचनाक खूप मोठी आणि खूपच आनंदाची गोष्ट माझ्या आयुष्यात घडतेय जिची मी आतुरतेनं वाट पाहत होतो. ‘ती’ माझ्या आयुष्यात आलीये आणि ज्याबद्दल तुम्हीही मला सतत विचारायचे की ‘कधी सत्या कधी?’. तर मित्रांनो आमचं सगळं ठरलंय आणि मुहुर्तही ठरलाय. आता तुमच्या सोबत आनंद शेअर करायचाय. म्हणून उद्या भेटूयात 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता फेसबुक आणि 7 वाजता इन्स्टाग्रामवर लाइव्हवर. नक्की यायचं हं, आग्रहाचं आमंत्रण.
संतोष पुढे म्हणाला की, ‘ही post बघून तुमच्या मनात नक्कीच एक विचार आलाय आणि जो आलाय तो अगदी योग्य आहे’. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट करत लग्न करणार असल्याचं म्हटलंय. शिवाय त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यामुळे त्याचे चाहते या बातमीसाठी खूप उत्साही असून तो त्याच्या तोंडाने ही बातमी कधी सांगतोय असं त्यांना झालंय. चाहते संतोषला नेहमीच लग्नाविषयी प्रश्न विचारायचे. अखेर तो लग्न करणार असल्याचं त्याच्या नव्या पोस्टवरुन दिसतंय.
दरम्यान, संतोष जुवेकरनं अनेक मराठी मालिका, चित्रपट, वेबसेरिजमध्ये काम केलं आहे. त्यानं साकारलेल्या निराळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच भरभरुन प्रेम दिलेलं पहायला मिळालं. त्यानं आपल्या वेगळ्या शैलीनं आणि दमदार अभिनयानं नेहमीच चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित केलं आहे.