ामुंबई, 24 जुलै- चटपटीत पदार्थ आवडत नाही अशी व्यक्ती विरळच असेल. त्यातही महाराष्ट्रात तर चटपटीत पदार्थांचे किती तरी चविष्ट पर्याय उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे पदार्थ आवडतात. तसंच, गरीब असो वा श्रीमंत सर्वजण हे पदार्थ खातात. उदाहरण सांगायचे तर, वडापाव आणि मिसळपाव. अगदी हातावर पोट असलेल्या व्यक्तींना साग्रसंगीत जेवण जेवणं परवडणारं नसतं. त्या व्यक्ती वडापाव किंवा मिसळपाव या पदार्थांच्या साह्याने आपली भूक भागवतात. दुसरीकडे, हे पदार्थ आवडणाऱ्यांमध्ये सेलेब्रिटींचाही समावेश होतो. वेगवेगळे सेलेब्रिटी वेळोवेळी आपल्या आवडत्या स्नॅक्सची किंवा स्ट्रीट फूडची नावं सांगत असतात. अभिनेता अभिषेक बच्चनला देखील असाच एक पदार्थ आवडतो. त्याच्या दिवसाची सुरूवातचं या पदार्थाने होते. त्याला मिसळ अतिशय आवडते, असं त्याने एका मुलाखतीत सांगितले. शिवाय आणखीही काही पदार्थांबद्दल त्याने सांगितलं. एका इन्स्टाग्राम पेजने अभिषेकशी संवाद साधला. त्यावेळी त्याने त्याच्या आवडीच्या पदार्थाविषयी सांगितले. वाचा- ‘वय हा फक्त…’, मिलिंद गवळींची जयंत सावरकरांसाठी लिहिलेली जुनी पोस्ट व्हायरल ‘आय अॅम ए बिग मिसळ फॅन पर्सन’ अशा शब्दांत अभिषेकने स्वतःचं मिसळप्रेम व्यक्त केलं. ‘शूटिंग सुरू असतं, तेव्हा मी दररोज सकाळी मिसळ खातो,’ असंही त्याने सांगितलं. ‘सर्वोत्तम मिसळ ठाण्यात मिळते,’ असं सांगताना अभिषेकने ‘मामलेदार मिसळ’चा उल्लेख केला. मामलेदार मिसळ बेस्ट असते असं त्याने सांगितलं.महाराष्ट्रातलं दुसरं महत्त्वाचं स्ट्रीट फूड म्हणजे वडा-पाव. ‘वडा-पावसाठी शिवाजी पार्क बेस्ट आहे,’ असं सांगतानाच ‘मिठीबाई कॉलेजच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावरही चांगला वडा-पाव मिळतो,’ असंही अभिषेकने सांगितले.
शिवाय अभिषेक पुढे म्हणाला की, ‘पावासोबत अंडा बुर्जी फ्राय हा सकाळी लवकरच्या वेळेत आवर्जून हवाच असा पदार्थ,’ आहे. थोडक्यात सांगायचं तर, मिसळ-पाव, वडा-पाव आणि अंडा बुर्जी-पाव हे अभिषेकला आवडणारे पदार्थ आहेत.
महाराष्ट्रातल्या व्यक्तीला मिसळीबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाहीच. कारण मिसळ हे अत्यंत लोकप्रिय असं महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड आहे. राज्याच्या सगळ्या भागांत मिसळ मिळतेच. पण पुणेरी, कोल्हापुरी, नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या मिसळींची खासियत वेगवेगळी असते. बॉलिवूडचे अनेक स्टार आहेत, ज्यांना मिसळ हा पदार्थ आवडतो.