मुंबई, 8 ऑक्टोबर- मराठी सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आजही लोकांच्या मनावर राज्य करतात. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत लेक अभिनय बेर्डे मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमठवत आहे. सध्या अभिनय बेर्डे आपल्या ‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. या रॉकिंग चित्रपटात अभिनय हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 15’ ची विजेती तेजस्वी प्रकाशसोबत झळकणार आहे. हे दोघेही सतत प्रमोशनदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच एका नेटकऱ्याने अभिनयला ट्रोल करत एक कमेंट केली होती. आता अभिनयने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनय आणि तेजस्वी सध्या व्यग्र आहेत. नुकतंच पिल्लई एज्युकेशन कॅम्पसमध्ये या चित्रपटाचा लॉन्चिंग सोहळा पार पडला. हा सोहळा फारच धमाकेदार झालेला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे अभिनय आणि तेजस्वीने ढोल वाजवत या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. या दोघांनी ढोल पथकाच्या तालावर ताल धरत तुफान नृत्यदेखील केलं. या दोघांचे कार्यक्रमादरम्यानचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (हे वाचा: तेजस्वी प्रकाशच्या मराठी सिनेमाचं गाणं रिलीज; दणकून नाचली अभिनेत्री, Video व्हायरल **)**
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओंवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स केल्या जात आहेत. सोबतच अभिनयनेसुद्धा कार्यक्रमादरम्यानचा आपल्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. इतकंच नव्हे तर डान्स करत असताना अभिनयच्या तोंडात काहीतरी असल्याचं जाणवत आहे. तो काहीतरी चघळताना दिसून येत आहे. हीच बाब ध्यानात घेत एका नेटकऱ्याने अभिनयला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिनयचा हा इन्स्टाग्राम व्हिडीओ पाहून नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय, ‘तू मावा खातोस का?’ यावर आपल्या हटके अंदाजात उत्तर देत अभिनयने म्हटलं, ‘तोंड संभाळून बोला… मावा खात नाही पण मवाली आहे मी’. अशा तिखट शब्दांत प्रत्युत्तर देत अभिनयने नेटकऱ्याच तोंड बंद केलं आहे. सध्या अभिनची ही प्रतिक्रिया प्रचंड चर्चेत आली आहे. येत्या 4 नोव्हेंबरला ‘मन कस्तुरी रे’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याआधी सिनेमाचं दणकून प्रमोशन सुरू आहे. नुकतंच सिनेमात एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं.

)







