मुंबई, 16 जून : सारेगमप लिटिल चॅम्प या प्रसिद्ध शो मधून महाराष्ट्राला मिळालेली गोड गळ्याची गायिका म्हणजे आर्या आंबेकर. मुळची नागपूरची असलेली आर्या आता संपूर्ण महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत झाली आहे. आपल्या सुमधूर आवाजानं आर्यानं केवळ तरूणांचीच नाही तर ज्येष्ठ मंडळींचीही मनं जिंकली आहेत. आर्याला गायनाचं बाळकडू तिच्या आईकडून मिळालं. तिची आई श्रृती आंबेकर देखील गायिका आहेत. आईकडूनच तिनं गायनाचे धडे घेतले. संगीत क्षेत्रातील नामवंत मंचावर आर्यानं गायन केलंय. तिथे तिच्या गायनाचं कौतुक झालं. शास्त्रीय संगीत, नाट्यगीते, भावगीते, भक्तीगीते ते आता मराठी सिनेमांची गाणी आणि मालिकांची शीर्षक गीते या सगळ्या गायनाच्या प्रकारात आर्यानं तिच्या गाण्याची छाप सोडली आहे. गायिका म्हणून उभारी घेत असताना तिनं ती सध्या काय करते या मराठी सिनेमात प्रमुख नायिका साकारत अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलं. आज सोशल मीडियावर देखील आर्या आंबेकरचा वेगळा चाहता वर्ग आहे. तिची गाणी सतत व्हायरल होत असतात. तिच्या आजवरच्या प्रवासातील तिची टॉप 5 गाणी कोणती आहेत पाहूयात. कितीदा नव्याने
ती सध्या काय करते सिनेमातील कितीदा नव्याने तुला पाहावे हे गाणं म्हणेज तरूणांच्या गळ्यातील ताईत आहे. आर्याच्या उत्तम आवाजानं आणि अभिनयानं भरलेलं हे गाणं प्रत्येकाचं आवडतं गाणं असेल यात काही शंका नाही. बाई ग
मागील वर्षी रिलीज झालेल्या चंद्रमुखी सिनेमातील बाई ग ही बैठकीची लावणी. आर्या आंबेकरच्या आतापर्यंतच्या गाण्यांमधील ही लावणी सर्वात वेगळी ठरते. बाई ग साठी आर्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. केवड्याचं पान तू
सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होणार गाणं म्हणजे केवड्याचं पान तू. आर्याचा आवाजाचा पुरेपूर गोडवा या गाण्यात उतरला आहे. सरला एक कोटी या सिनेमात अभिनेता ओंकार भोजने आणि इशा केसकर यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलंय. तुझेच मी गीत गात आहे
आर्यानं टेलिव्हिजन मालिकांची अनेक शीर्षक गीतं गायली आहेत. त्यातील सध्या सुरू असलेल्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेचं शीर्षक प्रेक्षकांचा पसंतीस उतरलं आहे. आर्याच्या आवाजातील या गाण्याच्या अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पिया बिन तरसत
आर्या आंबेकरनं गायलेली पिया बीन तरसत ही बंदिश आर्याच्या सर्वोत्तम गाण्यांमधील एक आहे. आर्याच्या आईनं ही बंदिश लिहीली आहे. तसंच साजन दारी उभा हे सुरेश भटांनी लिहिलेली आणि सलील कुलकर्णीचं म्युझिक असलेलं गाणं देखील आर्यानं उत्तम गायलं आहे.