सध्या बॉलिवूडमध्ये वेडिंग सीझन सुरू असून अजून एक अभिनेत्री बोहल्यावर चढली. बॉलिवूड अभिनेत्री आरती छाबडियाने नुकतंच गुपचुप लग्न केलं. आरतीने विशारदशी लग्न केलं.
सध्या सोशल मीडियावर आरती आणि विशारदच्या लग्नातले फोटो व्हायरल होत आहेत. विशारद ऑस्ट्रेलियामध्ये टॅक्स कंसल्टंटची नोकरी करतो. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लाल लेहंग्यामध्ये आरती फारच सुंदर दिसते.
आरतीच्या लग्नात टीव्ही अभिनेत्री शीना बजाज आणि रोहित पुरोहितही गेले होते. आरतीने याच वर्षी मार्च महिन्यात विशारदशी साखरपुडा केला होता. स्पॉटबॉयईशी बोलताना आरतीने साखरपुड्याची बातमी खरी असल्याचं म्हटलं होतं. आरती म्हणाली होती की, ‘मी आणि विशारदने ११ मार्चला घरातल्यांच्या उपस्थितीत मॉरिशसमध्ये साखरपुडा केला. मला निर्मळ माणूस भेटेल याची अपेक्षा मी सोडली होती. पण माझ्या आयुष्यात निशारद आला.’
३६ वर्षीय आरती पुढे म्हणाली की, ‘माझ्या कुटुंबाला वाटत होतं की मला सर्वात चांगला माणुस भेटेल. जेव्हा मी विशारदला भेटले तेव्हा मला कळलं की त्याच्यात ते सर्व आहे ज्याचा मला शोध होता. मी फार आनंदी आहे की खूप काळ वाट पाहिल्यानंतर अखेर माझं अरेंज मॅरेज होत आहे.’
आरतीने २००० मध्ये मिस इंडिया वर्ल्ड वाइड हा किताब जिंकला होता. यानंतर तिने तुमसे अच्छा कौन है या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर तिने लज्जा, शादी नंबर वन, पार्टनर आणि हे बेबी सिनेमात काम केलं होतं. याशिवाय आरतीने दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे.
आरतीने खतरों के खिलाडी या रिअलिटी शोच्या चौथ्या सिझनची विनर होती. तसेच तिने झलक दिखला जाच्या सहाव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.
तिने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली होती. आरतीने आतापर्यंत ३०० हून जास्त टीव्ही जाहिरातींमध्ये काम केलं आहे.