मुंबई, 29 मे- आई कुठे काय करते मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचे कथानक अरुंधती भोवती फिरताना दिसते. मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले साकारताना दिसते. सध्या मधुराणी मालिकेच्या चित्रीकरणातून ब्रेक घेत लेकीसोबत परदेशात सुट्टयांचा आनंद घेत आहे. परदेशातून मधुराणी लेकीसोबत धमाल करतानाचे व्हिडिओ, फोटो शेअर करताना दिसत आहे. या सगळ्यात तिनं या ट्रीपमध्ये तिला कोणी मदत केली याबद्दल देखील पोस्ट करत लिहिली आहे. अशातचं तिनं एक नवीन पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये तिनं नवरा-बायकोचं नातं कसं असावं याचं एक उदाहरण दिलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. मधुराणीनं पोस्टमध्येम म्हटलं आहे की, आमच्या ऑस्ट्रेलिया ट्रिपला चार चाँद लावले ते मंदार अनघा आणि आस्तिक च्या सहवासाने.मंदार माझा तसा लांबचा भाऊ … त्याला लहानपणापासूनच ओळखते. आणि अनघाचं आणि त्याचं तसं लहानपणीच जमलं त्यामुळे तिलाही अनेक वर्षं. दोघेही प्रचंड हुशार आहेत. मंदार CA तर अनघा भारी लेव्हलची डोळ्यांची डॉक्टर. दोघेही अनेक वर्षं सिडनीमध्ये राहतायत … तिथेही अतिशय मेहनत आणि एकमेकांना पूर्ण साथ देऊन यांनी स्वतः चं स्थान निर्माण केलंय.सिडनीत जाऊन त्यांच्याकडे जायचं नाही हे शक्यच नव्हतं.. ३ दिवस त्यांच्याबरोबर आणि अस्तिकबरोबर होतो …भारी मजा केली… खूप फिरलो आणि खूप खाल्लं…
दोघेही उत्साह आणि हास्याचा झरा आहेत. त्यांच्याबरोबरचे दिवस फार मजेत आणि अखंड हसण्यात गेले.दोघेही एकमेकांना अनेक वर्षे ओळखतात, अगदी कॉलेज पासून .. लग्नाला तर खूपच वर्षं झाली .. पण त्यांच्यातलं मैत्र अजूनही टिकून आहे. कुठेही ते टिपिकल ‘नवराबायको’ झाले नाहीयेत… आजही अगदी buddies सारखं नातं आहे त्यांच्यात… एकमेकांची खेचतात… टवाळक्या करतात..भांडतात… एकमेकांना तोंडावर काहीही बोलतात.. आम्ही हसून हसून फुटलो… स्वरालीला तर त्यांच्या जोडीच्या प्रेमात पडली…. त्यांची ही मैत्री अशीच आजन्म टिकून राहू दे.
मधुराणी पडद्यावर ज्याप्रमाणे आईची भूमिका साकरते तशी खऱ्या आयुष्यात देखील ती एका लेकीची आई आहे. मालिकेचे चित्रीकरणामुळे तिला आपल्या मुलगी स्वरालीला वेळ देता येत नाही. पण सगळं काही बाजूला ठेऊन मधुराणी मागच्या काही दिवसांपासून लेकीसोबत परदेश फिरताना दिसत आहे. शिवाय मधुराणी परदेशात तिच्या कविता वाचनाचे देखील कार्यक्रम करताना दिसली. परदेशात गेली असली तरी, तिनं तिच् काम बंद ठेवलेलं नाही. लेकीसोबत फिरत असताना तिनं तिचं काम देखील केलं आहे.