मुंबई, 3 जून- ‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत असतात. त्यामुळेच मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या मालिकेमुळे अनेक मराठी कलाकारांना नवी ओळख मिळाली आहे. मालिकेतील मुख्य पात्र साकारणाऱ्या अरुंधतीपासून ते खलनायक साकारणाऱ्या अनिरुद्धपर्यंत सर्वानांच प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. त्यामुळेच चाहत्यांना या कलाकारांच्या खाजगी आयुष्याबाबतही बरीच उत्सुकता लागून असते. मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी यांनी साकारली आहे. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेते मिलिंद गवळी हे मराठीतील एक उत्कृष्ट कलाकार आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत आपली छाप पाडली आहे. मात्र ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने मिलिंद यांना तुफान लोकप्रियता मिळवून दिली आहे. या मालिकेत त्यांनी नकारत्मक भूमिका साकारुनसुद्धा प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. मिलिंद गवळी या वयातही तितकेच सक्रिय असतात. मिलिंद गवळी मालिकेसोबतच सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड ऍक्टिव्ह असतात. ते सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपल्या खाजगी आयुष्याबाबत अपडेट्स देत असतात. अनेकवेळा ते आपल्याला आलेले अनुभव आणि कसोबत घडलेले किस्से शेअर करत असतात.
दरम्यान त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मिलिंद यांच्या खऱ्या आयुष्यातील ईशासुद्धा फारच सुंदर आणि गोड आहे. आज मिलिंद यांची मुलगी मिथिलाचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळी यांची इन्स्टा पोस्ट- वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…. मिथिला चा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी दिवाळी दसरां पेक्षा मोठा सण, तीन जून तारीख म्हणजे आमच्या आयुष्यातला मोठा क्षण,काही दिवस येतात आपल्या आयुष्यामध्ये जे आपलं आयुष्यच बदलून टाकतात, जीवन सुंदर वाटायला लागतं , जगायला एक कारण मिळतं, परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतो आणि एक छोटीसी परी तुमच्या घरी येते, आणि घरातलं वातावरणच सगळं बदलून जातात, सगळ्यांची सगळी काम बाजूला राहतात सगळ्यांचे सगळे महत्वाचे गोष्टी बाजूला ठेवल्या जातात आणि फक्त त्या एका जीवाच्या आजूबाजूला तुमचं जीवन सुरू होतं, तशीच आमच्या आयुष्यामध्ये मिथिला रूपाने एक सुंदरशी परी घरी आली,ती हसली की घरातले सगळे हसायचे ,ती रडली की सगळ्यांचे डोळे पाणावायचे , तिला झोप आली की मग सगळ्यांची झोपायची वेळ व्यायची , तिच्या अवतीभवती आमचं जग फिरायचं, आणि सगळ्यात जास्ती आजी आजोबांचं जग ती होती. आणि आजी आजोबांमुळे तिच्यावर खूप सुंदर संस्कार झाले.
त्यांनी पुढे लिहलंय, ‘‘असं म्हणतात की खूप भाग्यवान असतात ते आई वडील ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात, खरंच आम्ही मागच्या जन्मी काहीतरी खूप मोठ पुण्य केलं असेल म्हणून आम्हाला मिथिला झाली,आणि मुली कधी आणि कशा मोठ्या होऊन जातात ते आपल्याला कळत सुद्धा नाही, आणि एक दिवस एक राजकुमार येतो आणि आपली राजकुमारी त्याच्याबरोबर गगन भरारी घेत भुरकन उडून जातात , मिथिलाला दिग्वीजय ची गोड साथ मिळाली.पण मिथिला आकाशात कितीही उंच उडाली तरी एका घारी सारखी तिची आमच्या वर बारीक नजर सतत असते,आणि वडिलांना तर एक क्षण सुद्धा नजरेआड जाऊ देत नाही.प्रत्येक वाढदिवसाला आपलं बाळ थोडं मोठं झालं असं वाटण्या ऐवजी मला ती अजूनही माझं छोटसं बाळ आहे असंच वाटत राहतं.आज वाढदिवसाच्या दिवशी तुला खूप खूप आशीर्वाद, अशीच यशाची शिखरे पार करत रहा, सुखी आनंदी समाधानी रहा, आरोग्याची काळजी घे. Wish a very very Happy Birthday’’. असं म्हणत त्यांनी आपल्या मुलीवरील प्रेम व्यक्त केलं आहे.