मुंबई, 22 फेब्रुवारी- ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची घाई सुरु झाली आहे. काल नुकतंच मेहंदी सोहळ्याचा प्रोमोसमोर आला होता. दरम्यान आज आणखी एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये आशुतोषची नवरी बनण्यासाठी सज्ज असलेली अरुंधती सुंदर असा पारंपरिक मराठी उखाणा घेताना दिसून येत आहे. अरुंधतीचा हा उखाणा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर प्रेक्षक विविध कमेंट्ससुद्धा करत आहेत. स्टार प्रवाहवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते’ला ओळखलं जात. या मालिकेत सतत काही ना काही घडामोडी घडत असतात. त्यामुळे प्रेक्षकही मालिका पाहण्यासाठी आतुर असतात. अरुंधती अर्थातच आईच्या विश्वाभोवती फिरणारी ही मालिका असली तरी, या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा तितक्याच ताकतीने दाखवली जाते. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतसुद्धा नेहमीच पुढे असते. Aai Kuthe Kay Karte: मेहंदी सोहळ्यात मोठं विघ्न; अनिरुद्धमुळे पुसली गेली अरुंधतीच्या हातावरची मेहंदी दरम्यान मालिकेत आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत या दोघांच्या लग्नाची बोलणी सुरु आहे. मात्र अनिरुद्ध सतत काही ना काही अडचणी निर्माण करत आहे. त्यामुळे या लग्नाला विलंब होत आहे. मात्र आता या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. काल अरुंधतीचा मेहंदी सोहळा पार पडला. मात्र यामध्येसुद्धा अनिरुद्धने विघ्न आणत अरुंधतीच्या हातावरची मेहंदीच पुसली.
या सर्व प्रकारानंतर मालिकेच्या नव्या भागाचा एक सुंदर प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अरुंधती आपला होणार नवरा आशुतोषसाठी चक्क उखाणा घेताना दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर आशुतोषनेसुद्धा अरुंधतीसाठी खास उखाणा घेतला आहे. यावेळी अरुंधतीने उखाणा घेत म्हटलं, ‘आयुष्याच्या मध्यानीला अनुभवले शांत चांदणे सुखाचे..ध्यानीमनी नसताना लाभले आशुतोष जोडीदार आयुष्याचे.
तर दुसरीकडे आशुतोषने उखाणा घेत म्हटलंय, ‘बसलो होतो माझा मी माझ्याच विचारांच्या गावी.. दूरच्या क्षितिजावर होती मनातली पहाट नवी.. अवचित एका रुक्ष क्षणी मोगऱ्याचा सुगंध दरवळला… अरुंधतीच्या येण्याने मला जगण्याचा अर्थ समजला’. अशाप्रकारे या दोघांनी एकापेक्षा एक उखाणे घेत सर्वांनाच खुश केलं आहे.

)







