मुंबई, 15 सप्टेंबर : झी मराठीवरील होम मिनिस्टर’ कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला. आदेश भाऊजींची पैठणी पटकावण्याची आजपर्यंत लाखो कुटुंबांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. अनेक घरात आजही लाडक्या आदेश भाऊजींची आतुरतेने वाट पाहिली जाते. आदेश बांदेकरांची माणसांना बोलतं करण्याची शैली सगळ्यांनाच आवडते. अवघ्या तेरा दिवसांसाठी सुरु झालेल्या या कार्यक्रमाला बघता बघता 18 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं आदेश बांदेकरांनी होम मिनिस्टरच्या टीमसह सेलिब्रेशन केलं आहे. त्यांनी अठरा वर्षांच्या प्रवासाच्या आठवणी यावेळी जाग्या केल्या आहेत. झी मराठीने त्यांच्या इंस्टाग्राम चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये आदेश भाऊजींबरोबर कार्यक्रमाचे पडद्यामागचे कलाकार आहेत ज्यांनी इतके वर्ष या शोला साथ दिली आहे. या आनंदाच्या क्षणी आदेश बांदेकरांनी भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावेळी बांदेकर म्हणाले, ‘13 सप्टेंबर 2004 ला हा कार्यक्रम सुरू झाला. तेरा दिवसांसाठी सुरू झालेला हा कार्यक्रम इतका मोठा इतिहास घडवेल असं वाटलं नव्हतं. मी भाग्यवान की या आनंदयात्रेच्या पालखीचा भोई होण्याचं भाग्य मला लाभलं. जी जी स्वप्न पाहिली होती, ती सगळी पूर्ण झाली. या कार्यक्रमानं वेगळा आशीर्वाद दिला.’
पुढे आदेश बांदेकर म्हणाले कि, ‘जगाच्या नकाशावर रोज एका कुटुंबाला बोलतं करणारा आणि इतकी वर्ष चालणारा एकही कार्यक्रम नाही.’ यावेळी त्यांनी झी मराठीचे देखील आभार मानले. यावेळी त्यांच्या बरोबर पडद्यामागची टीम होती. पण लक्षवेधी ठरलं ते आदेश बांदेकरांनी एका स्पॉट बॉयला दिलेला मान. १८ वर्ष होम मिनिस्टर मध्ये स्पाॅट बाॅय म्हणून काम करणारे मिथिलेश यांच्या हातून केक कापण्यात आला. बांदेकर या टीमचं कौतुक करत म्हणाले कि, ‘‘करोना काळात कार्यक्रम बंद होता, तरीही ही टीम इथेच राहिली. दुसरीकडे गेली नाही.’’ हेही वाचा - Mazhi tuzhi reshimgath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ घेणार नाही प्रेक्षकांचा निरोप; यश आणि नेहा भेटणार नव्या वेळेत होम मिनिस्टर आता रोज संध्याकाळी 6वाजता पाहता येईल. 6:30 वाजता माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका दाखवली जाणार आहे. होम मिनिस्टरच्या या पर्वात ‘महा मिनिस्टर’ची विशेष चर्चा झाली ती, 11 लाखांच्या पैठणीमुळं.
या कार्यक्रमात आदेश भावोजी विजेत्या वहिनीला चक्क 11 लाख रुपयांची पैठणी बक्षीस म्हणून देणार होते. राज्याच्या जिल्ह्या-जिल्ह्यात या शोचे खेळ रंगले होते. त्यामुळं कोणत्या जिल्ह्यातील वहिनी पैठणी पटकावणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. हा भाग खूपच लोकप्रिय झाला होता.