औरंगजेबची आठवण करून देणारी फटाकेबंदी !

औरंगजेबची आठवण करून देणारी फटाकेबंदी !

"औरंगजेबाला हे पुरेसे वाटले नाही म्हणून त्याने आणखी एक फतवा काढून दिवाळी व होळी हे हिंदूंचे सण हिंदूंनी यापुढे गावात साजरे न करता गावाबाहेर जाऊन साजरे करावेत असाही आदेश काढला ! त्याचे कारण होते - या सणांमुळे जो गोंधळ - आवाज होतो त्यामुळे गावातील मशिदींचा शांतता भंग होतो."

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या फटाकेबंदीच्या निर्णयावरून सध्या सगळीकडे शब्दांचे बॉम्ब, निराशेच्या लडी, आनंदाचे फुलबाजे उडताहेत. पण न्यायालयाच्या या निर्णयाने इतिहासात दडलेले एक सत्य बाहेर आलेले आहे. हे ऐतिहासिक सत्य विद्यमान केंद्र सरकारला मात्र आवडणार नाही. होय, ज्या शांतताभंगाच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली परिसरात फटाकेबंदी  लागू केली आहे, अगदी तशीच बंदी १६६८ मध्ये धर्मांधतेसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या मुघल सम्राट औरंगजेबाने केली होती. "औरंगजेब -सत्यता आणि शोकांतिका" या रवींद्र गोडबोले लिखित पुस्तकात पृष्ठ क्रमांक ९७ वर त्याचा स्पष्ट उल्लेख आहे, तो असा, "औरंगजेबाला हे पुरेसे वाटले नाही म्हणून त्याने आणखी एक फतवा काढून दिवाळी व होळी हे हिंदूंचे सण हिंदूंनी यापुढे गावात साजरे न करता गावाबाहेर जाऊन साजरे करावेत असाही आदेश काढला ! त्याचे कारण होते - या सणांमुळे जो गोंधळ - आवाज होतो त्यामुळे गावातील मशिदींचा शांतता भंग होतो. असा शांतताभंग होणे इस्लामला मंजूर नाही. औरंगजेबाचा हा फतवा म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांच्या वस्त्यांमध्ये जातीय विद्वेष पेटविणारी ठिणगी ठरली, जिची आग आपण आजही अनुभवत आहोत."

म्हणजे बरोबर ३४९ वर्षांपूर्वी जो निर्णय औरंगजेबाने एका फतव्याद्वारे काढला होता, तोच आता उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यावर सत्ताधारी भाजपसह, काँग्रेस,राष्ट्रवादी पासून सगळ्याच पक्षांनी वेगवेगळी मत-मतांतरे दिली आहेत.

लेखक चेतन भगत यांनी अगदी सुरुवातीलाच याविषयी विरोधात मत व्यक्त करून टीकेची राळ उडवून दिली, "फटाक्याशिवाय दिवाळी,ट्रीशिवाय क्रिसमससारखे फटाके फोडल्याविना दिवाळी साजरी करणे म्हणजे ट्रीशिवाय क्रिसमस व बकरीच्या कुर्बानीशिवाय बकरी ईद साजरी करण्यासारखे आहे." असं बोलून भगत यांनी सोशल मीडियावर अक्षरश : आग लावून दिली आहे.

त्यात भर टाकली राज ठाकरे यांच्या आक्रमक विधानाने..."आता आम्ही काय व्हाॅटस्अॅपवर फटाके फोडायचे का?" असा सवाल उपस्थितीत करून राज ठाकरे यांनी त्यांच्या ठाकरी भाषेत न्यायालयाच्या निर्णयाला आव्हानं दिलं. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला तर फटाकेबंदीच्या बातमीने आयतं कोलीतच सापडलं. दोन दिवसांच्या सामना वृत्तपत्रात त्याचे पडसाद आणि पडघम आपल्याला उमटताना दिसताय.

दरम्यान फटाकेबंदीच्या निर्णयाचं केंद्रीय पर्यावरण मंत्री यांनी ट्विटरवर स्वागत केलं होतं. पण नंतर या निर्णयावर टीका होऊ लागल्यावर त्यांचे ट्विट काढून घेण्यात आले आहे.

पण त्यातून काही बोध न घेता, दिल्लीच्या नागरिकांना जर फटाके फोडून दिवाळी साजरी करायची असेल तर त्यांनी भोपाळला यावं असं धक्कादायक विधान मध्यप्रदेशचे राज्य गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी केलं आहे.

सुप्रीम कोर्टाने दिल्ली आणि परिसरात फटाके विक्रीस बंदी केल्यानंतर त्यांनी हे विधान केलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार दिल्लीच्या नागरिकांना फटाके फोडता येतील अशी सगळी व्यवस्था भोपाळमध्ये करण्यात येईल असंही भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं. तसंच फटाके फोडल्याने भोपाळच्या पर्यावरणाला काही धोका नाही असंही विधान त्यांनी केलं आहे. 'आपण रामराज्य आणण्याच्या गप्पा करतो. पण जर राम वनवासातून घरी परत येण्याचा दिवाळीचा सणच जर आपण साजरा करू शकत नसू तर त्याला काय अर्थ आहे'.

दिल्ली स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी हा फटाके विक्रीवर बंदी सुप्रीम कोर्टाने आणली आहे.या निर्णया वर बोलताना सिंह यांनी आप सरकारला ही टोला लगावला आहे. 'वाहनांमुळे प्रदूषित झालेली दिल्लीचं पर्यावरण सुधारण्यासाठी आप सरकारने मेहनत घ्यायला हवी'. तसंच शिवराजसिंह चौहान यांच्या राज्यात पर्यावरण उत्तम आहे असंही त्यांनी सांगितलंय.

दिल्ली पाठोपाठ, मुंबई उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाक्यांची खुलेआम विक्री करण्यावर बंदी आणली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने ही मनाई केली आहे. तसेच नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे.

फटाक्यांची विक्री करणारे अनधिकृत स्टॉल्स आणि निवासी भागातील फटाक्यांचे स्टॉल्स याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश सर्वत्र लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या बंदीनुसार रहिवासी भागात फटाके विक्रीला पूर्णपणे बंदी घालावी आणि ज्यांचे विक्री परवाने निवासी भागात आहेत. त्यांचे परवाने तातडीने रद्द करण्यात यावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये यंदाच्या दिवाळीत फटाके विक्री होणार नाही.सुप्रीम कोर्टाने येथे ३१ ऑक्टोबरपर्यंत फटाके विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र,फटाके फोडण्यावर बंदी नाही. खरेदी केलेले फटाके नागरिक फोडू शकतात.१ नोव्हेंबरपासून काही अटींवर फटाके विकण्याची परवानगी असेल, असे सांगितले जाते.

२०१५ मध्ये अर्जुन,आरव व झोया या तीन मुलांनी नातेवाइकांमार्फत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले की,दिल्लीत प्रदूषण घातक स्तरावर पोहोचले आहे.त्यांना शुद्ध हवेत श्वास घेण्याचा हक्क आहे. दिवाळीसारख्या सणांत फटाके विक्रीवर बंदी घातली जावी. यावरील सुनावणीत कोर्टाने गेल्यावर्षी ११ नोव्हेंबर रोजी फटाके विक्रीवर बंदी घातली होती. या वर्षी १२ सप्टेंबर रोजी त्यात सूट दिली. मात्र,मुलांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली.यानंतर नवा आदेश आला आहे. आता त्याची अंमलबजावणी कशी होते यावर या आदेशाचे भवितव्य अवलंबून असेल, असे म्हणायला हरकत नाही. पण हा औरंगजेबाचा जो संदर्भ या निर्णयाशी जुळणारा आहे, त्यावर भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, याविषयी काय मत आहे, ते मात्र अजूनही समोर आलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 07:42 PM IST

ताज्या बातम्या