बंगळुरू 19 मार्च : झोमॅटो डिलिव्हरी बॉय (Zomato Delivery Boy) कामराज याच्यावर आरोप करणारी बंगळुरूमधील हितेशा चंद्राणी (Hitesha Chandranee) मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. या प्रकरणात रोज काहीतरी नवी माहिती समोर येत असतानाच आता पुन्हा एकदा हितेशानं सध्या समोर येणाऱ्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस तपासापासून वाचवण्यासाठी तिनं बंगळुरू सोडलं असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, हितेशानं या गोष्टीला साफ नकार देत ही केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असं म्हटलं, की पोलीस तपासाला मी पूर्णपणे सहकार्य करत आहे. हितेशानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत आरोप केला होता, की ऑर्डर घेण्यास नकार दिल्यानं झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं तिच्यावर हल्ला केला. याच व्हिडीओनंतर हे संपूर्ण प्रकरण प्रचंड चर्चेत आलं.
हितेशानं मांडली स्वतःची बाजू -
हितेशा चंद्राणीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं, की मी पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य करत आहे आणि मी बंगळुरू सोडलेलं नाही. बंगळुरू माझ्यासाठी माझं घर आहे. पुढे ती म्हणाली, की मला त्रास दिला गेला, मला चुकीची वागणूक देण्यात आली. इतकंच नाही तर मला धमकीही देण्यात आली. घटनेमध्ये माझं नाकही फ्रॅक्चर झालं, त्यावरही मला उपचार घ्यावे लागले. अनेक लोकांनी माझ्याविरोधात अपमानास्पद शब्दांचा वापर करत धमकी देणारे फोन मला केले.
डिलिव्हरी बॉयनं हितेशाविरोधात केली तक्रार -
याआधीच झोमॅटो डिलिव्हरी बॉय कामराजच्या तक्रारीनुसार हितेशाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. कामराजच्या तक्रारीनुसार बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाण्यात हितेशाच्या विरोधात आयपीसी कलम 355 (हल्ला), 504 (अपमान) आणि 506 (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, हितेशानं केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी कामराजला अटक केलं आहे.
काय आहे प्रकरण -
ऑर्डर उशिरा (order delay) आल्याच्या वादातून झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने (Zomato delivery boy) आपल्याला मारहाण केली असा दावा बंगळुरुतील हितेशा चंद्राणी (Hitesha Chandranee) या महिलेनं केला होता. या महिलेनं रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.
कामराजने दिलेल्या जबानीमध्ये त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हितेशा चंद्राणी यांच्या घरी मी उशिरा पोहचलो. खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे मी उशिरा पोहचलो असं सांगून त्यांची माफी मागितली. त्यांनी (हितेशा) कॅश ऑन डिलिव्हरी (cash on delivery) हा पर्याय निवडल्याने मी त्यांच्याकडे पैसे देण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी हितेशा यांनी जेवण ताब्यात घेतलं, पण आपण कस्टमर सपोर्टशी बोलत असल्याचं सांगून पैसे देण्यास नकार दिला,' असं कामराज यांनी सांगितलं.
'त्यानंतर हितेशा अचानक जोरात ओरडायला आणि शिव्या द्यायला लागल्या. कस्टमर सपोर्टने मला ऑर्डर कॅन्सल झाल्याचं सांगून पार्सल परत घेण्याची सूचना केली होती. त्यांनी पार्सल देण्यास नकार दिला. मी त्या ठिकाणचं एकूण वातावरण पाहून पार्सल न घेता परत जाण्याचं ठरवलं,' असा अनुभव कामराजने सांगितला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Financial fraud, Instagram post, Social media viral, Zomato