जालना, 29 नोव्हेंबर : जालन्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह तिच्या काकाच्या घरात असलेल्या बाथरुममध्ये आढळून आला आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. चौधरी नगर परिसरातील ही घटना आहे. दरम्यान आपल्याच 14 वर्षांच्या मुलीने तिच्या चुलत बहिणीची हत्या केली असं हत्या झालेल्या मुलीच्या काकूने सांगितलं. ईश्वरी रमेश भोसले असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. ती आपल्या काकांकडे शिक्षणासाठी जालन्यात राहात होती.
'आपल्याच मुलीने ईश्वरीची हत्या केली'
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी या चिमुकलीचा मृतदेह बाथरुममध्ये आढळून आला. आपल्याच मुलीने इश्वरीची हत्या केल्याचा आरोप इश्वरीच्या काकूने केला आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी म्हटलं की, माझ्या मुलीने बाथरुमचा दरवाजा बंद करून ईश्वरीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर ब्लेडने वार केले. त्यानंतर तिने त्याच ब्लेडने तिचा गळा कापला. नळाच्या पाण्याने रक्ताचे डाग धुतले, त्यानंतर तिने ती ब्लेड भांड्यात ठेवली.
हेही वाचा : एसटी बसने बैलगाडीला उडवलं; आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू
शिक्षणासाठी काकाकडे राहात होती
ईश्वरीचे वडील रमेश भोसले हे शेतकरी आहेत. ते एका खेडेगावात राहातात. त्यांनी आपली मुलगी आपल्या भावाकडे शिक्षणासाठी पाठवली होती. रमेश यांच्या भावाचा जालना जिल्ह्यातील घनसांवगी इथे पॅथॉलॉजी लॅब आहे. ते घनसांवगी येथून जाऊन, येऊन करतात. त्यामुळे जेव्हा पुतणीची हत्या झाली त्यावेळी ते घरात नव्हते. ईश्वरी ही तिच्या काकाच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला उपचारासाठी जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. ईश्वरी आणि तिच्या चुलत बहिणीमध्ये छोट्या-छोट्या कारणांवरून सतत भाडंण होत असत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.