अमित राना, प्रतिनिधी गाझियाबाद, 30 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या मोठ्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच खूनाच्याही घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मैत्रिणीला रात्री भेटायला गेलेल्या एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ही घटना घडली. परवेज असे मृत तरुणाचे नाव आहे. तो लोणीतील मुस्तफाबादचा रहिवासी आहे. परवेजला मारहाण केल्यानंतर आरोपींनी स्वतः पोलिसांना फोन केला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परवेझला गाझियाबादच्या एमएमजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, इथे उपचारादरम्यान परवेजचा मृत्यू झाला.
आरोपींनी सांगितले की, परवेज चोरी करण्यासाठी घरात घुसला होता, त्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. तर मृत परवेजच्या वडिलांनी मारहाण करणाऱ्यांवर आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. मात्र, पोलिसांनी तपास केला असता वेगळीच माहिती समोर आली आहे.
पोलीस तपासात ही माहिती आली समोर - पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता ही हत्या चोरीच्या संशयावरून नसून अन्य काही कारणातून झाल्याचे समोर आले. या हत्येतील मुख्य आरोपी संजय याच्या मुलीला परवेज ओळखत होता. परवेज काल रात्री संजयच्या मुलीला भेटण्यासाठी आला होता. दरम्यान, घरच्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर परवेज बेशुद्ध झाल्यावर संजय आणि त्याच्या कुटुंबीयांनी हा प्रकार लपवण्यासाठी पोलिसांना फोन केला आणि चोरीच्या उद्देशाने घरात घुसून घरफोडी केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी कसून तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जाऊन तपास केला असता, परवेजचा खून कोणत्या पद्धतीने झाला, ही माहिती समोर आली. मात्र, या प्रकरणी आणखी माहिती समोर यायची बाकी आहे. परवेज हा लोणीहून खोडा संजयच्या घरी कसा आला आणि असे काय झाले की, परवेजला एवढी बेदम मारहाण करण्यात आली हे अद्याप समोर आलेले नाही. ट्रान्स हिंडनचे डीसीपी विवेक चंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीतरी चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात घुसले आहे, ज्याला पकडून मारहाण करण्यात आली, अशी माहिती रात्री उशिरा त्यांना मिळाली होती. यानंतर डायल 112 वाहनाने घटनास्थळ गाठून जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर मृत परवेजचे नातेवाईक जेव्हा त्याच्या मृत्यूनंतर तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी आपल्या मुलाची हत्या झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.