विजय देसाई, प्रतिनिधी अर्नाळा (पालघर), 22 फेब्रुवारी : सोशल मीडियावर पोलिसात नोकरी शोधत असाल तर महिलांची फसवणूक होऊ शकते. अनोळखी व्यक्तीसोबत सोशल मीडियावर मैत्री करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसात नोकरी देण्याच्या आमिषाने एका इन्स्टाग्रामवरील फ्रेंडने एका महिलेला चक्क 2 लाखात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्नाळा पोलिसांनी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी अर्नाळा पोलिसांचे पथक पाठवून 27 वर्षीय पीडित महिलेची सुटका केली. याप्रकरणी या तरुणीला विकत घेणाऱ्या आरोपी चेतन भारती याला पोलिसांनी अटक केली असून 3 फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण - अर्नाळ्यातील एक 27 वर्षीय महिलेची इन्स्टाग्रामवरील फ्रेंडने मोठी फसवणूक केली आहे. पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून सोशल मिडीयावर कुठे भरती आहे का, कुठे ट्रेनिंग मिळतेय का, याचा शोध घेत एक तरुणी घेत होती. नेमका याचाच फायदा एकाने घेतला. आरोपी दिनेश पुरी याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आर्मीचे, पोलीस ट्रेनिंगचे फोटो पीडितेला पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी तिला औरंगाबाद येथे पोलीस भरतीचे ट्रेनिंग आहे, असे सांगून तिला 11 जानेवारी 2023ला 9.55 वाजेच्या रेल्वेने औरंगाबादला बोलावले. ती पहाटे 5 वाजता औरंगाबाद येथे पोहोचल्या नंतर इन्स्टाग्रामवरील फ्रेंड दिनेशने तिला राजस्थानच्या पोलिसात तुझे काम झाले आहे. तू लगेच 10.15 ची राजस्थानची ट्रेन पकडून पालंगपूर रेल्वे स्टेशनवर उतर. असे त्याने तिला सांगितले. त्यामुळे त्याच्या सांगण्यावरुन तिने पकडली. यानंतर पालंगपूर बस डेपोतून भीमनाल येथे रात्री 9 वाजता पोहचली असता तिला घेण्यासाठी चेतन भारती, भावेश पुरी, मसर पुरी हे बस थांब्यावर आले होते. त्यानंतर तिला चेतनच्या बहिणीच्या घरी नेऊन जबरदस्ती घुंगट घागरा घालून भिमनाल कोर्टात तिचे 16 जानेवारीला जबरदस्ती लग्न लावले. तसेच एका कारमध्ये त्यांनी तिला 2 दिवस फिरवले यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा चेतनच्या बहिणीच्या घरी घेवून गेले. तेव्हा पीडितेने मला इथे का आणले, असे विचरल्यावर त्यांनी आम्ही तुला 2 लाखांना विकत घेतले असून दिनेशला दिलेल्या पैशांचा स्क्रीन शॉट दाखवला. तसेच चेतनसोबत तुझे लग्न झाले असून आम्ही सांगू तस करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर चेतनच्या गावी तिला सोडण्यात आले. दरम्यान, तिची तब्येत बिघडल्यावर दवाखान्यात दाखवून तिला पुन्हा घरी नेण्यात आले. हेही वाचा - चारित्र्याचा संशय, पत्नीसह मुलगा आणि सासऱ्यालाही जाळले, गोंदियात आरतीसोबत घडलं भयानक त्यावेळी तेथील एका व्यक्तीच्या मोबाईल वरून पीडितेने आपल्या बहिणीला फोन करून सांगितल्यावर बहिणीने अर्नाळा पोलिसांना खबर दिली. यानंतर पोलिसांनी तत्काळ राजस्थान गाठून पिडीत महिलेची सुटका केली आणि तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दिनेश पुरी, मसरपुरी, भावेश पुरी आणि चेतन भारती याच्याविरोधात गुन्हा दाखल करून चेतन भारतीला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास अर्नाळा पोलीस करीत आहेत. लग्नासाठी मुलगी मिळेना, मग काय पैसा बोलता है - पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेतन भारती हा वाहनचालक आहे. त्यांच्या गावात लग्नासाठी कोणी मुली देत नसल्याने त्याने या तरुणीला विकत घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील जाहिरातींची सत्यता तपासावी, अनोळखी व्यक्तीशी मैत्री किवा व्यवहार करू नये, असे आवाहन अर्नाळा पोलिसांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.