नवी दिल्ली 07 ऑगस्ट : न्यूयॉर्कमध्ये पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका भारतीय वंशाच्या महिलेने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने व्हिडिओ बनवून पतीने केलेल्या छळाबद्दल सांगितलं. केवळ मुलीच झाल्या म्हणून तिचा पती तिला रोज मारहाण करत असल्याचा आरोप महिलेनं केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाजातील या कलंकाबद्दल लोक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये 30 वर्षीय मनदीप कौर म्हणताना दिसत आहे की, मी हे सर्व सहन केलं, या आशेनं की एक दिवस तो आपलं वागणं बदलेल. सहा आणि चार वर्षांच्या दोन मुलींची आई रडतच हे सगळं सांगत आहे. आठ वर्षे झाली, आता मी हे रोजची मारहाण सहन करू शकत नाही. पंजाबी भाषेत बोलताना तिने पती आणि सासरच्या मंडळींवर आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. ती म्हणाली, ‘बाबा, मी मरणार आहे, मला माफ करा.’
There are collosal problems in our family & social structure which we conveniently ignore or deny to accept. #DomesticViolence against women is one such serious problem. Suicide by Mandeep Kaur a NRI Punjabi woman is a wake up call to accept the problem and fix it accordingly. pic.twitter.com/F8WpkiLCZY
— Gurshamshir Singh Waraich (@gurshamshir) August 5, 2022
महिलेचे वडील जसपाल सिंग यांनी अमेरिकेत राहणारा तिचा पती आणि भारतात राहणाऱ्या तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ते म्हणाले की आमचे नातेवाईक न्यूयॉर्कमधील पोलिसांकडे जाऊन या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रयत्न करत आहेत. आमच्या नाती सुरक्षित राहाव्या एवढीच आता इच्छा आहे. त्या अजूनही आपल्या वडिलांसोबत आहेत. यूपीच्या बिजनौर येथील रहिवासी मनदीप कौर आणि रणजोधबीर सिंग संधू यांचा विवाह 2015 मध्ये झाला होता. महिलेचा पती किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बिजनौरमधील कौरच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांना आशा होती की, हा अत्याचार कधीतरी संपेल. महिलेच्या वडिलांनी सांगितलं की आम्ही एकदा हस्तक्षेप केला आणि न्यूयॉर्कमध्ये पोलिसांकडेही गेलो होतो. पण त्याने आम्हाला मागे हटण्यास भाग पाडलं आणि आपल्या पत्नीची समजूत काढली. आता महिलेचा मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबीयांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. दरम्यान आत्महत्येआधीचा महिलेचा हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे.