तुषार कोहळे, प्रतिनिधी नागपूर, 02 मार्च : पती-पत्नीच्या अंतर्गत वादातून जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीची ब्लेडने गळा चिरून हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना नागपूरमध्ये घडली आहे. मुलीचा हत्या केल्यानंतर पित्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशपूर येथे सोमवारी रात्री 7.30 ते 8 वाजेच्या सुमारास घडली. मृतक राधिका सयाम अवघ्या दोन वर्षांची असल्याने तिला ज्या यातना झाल्या असेल त्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. किशोर सयाम हा नराधम या घटनेतला आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर हा पत्नी पूजा आणि दोन वर्षांची मुलगी राधिकासह गणेशपूर येथे दास यांच्याकडे भाड्याने राहत होते. ते मूळचे उमरवाही, ता. सिंदेवाही, जि.चंद्रपूर येथील राहणारे आहेत. काही दिवसांपासून किशोर हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारू पिऊन मारहाण करायचा. नेहमी सोडचिठ्ठीची मागणी करायचा. सोमवारी तो सकाळपासून दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करीत होता. याची तक्रार देण्यासाठी पूजा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आली तेव्हा राधिका आणि आरोपी किशोर घरीच होते. पत्नी जेव्हा पोलिसांना घेऊन घरी गेली तेव्हा मुलगी राधिका ही रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. किशोर देखील जखमी अवस्थेत होता. पोलिसांनी तत्काळ मुलीला उपचारार्थ रुग्णालयात हलविले. परंतु, तोपर्यंत बराच उशीर झाला होता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी किशोरला अटक केली आहे. किशोरला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.