मुंबई, 14 जून : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) मुंबई झोनल यूनिटने मालाडमधील एका बेकरीवर छापेमारी करीत ड्रग्जच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. NCB ने बेकरीच्या मालकासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. NCB ने दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी केक आणि पेस्ट्रीमध्ये ड्रग्ज मिसळत होते. आणि काही ठराविक ग्राहकांना सप्लाय करीत होते. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे ड्रग्जच्या सप्लायचा खुलासा झाला आहे.
20 वर्षांची तरुणी आहे याची मास्टरमाइंड
NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितलं की, काही लोक बेकरीच्या आडून ड्रग्जचा सप्लाय करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यानंतर रविवारी 'बेक द बेकर्स' नावाच्या बेकरीमध्ये छापेमारी करण्यात आली, येथे 160 ग्रॅम गांजा सापडला आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, एजन्सीने बचावासाठी ड्रग्स केक, पेस्ट्री आणि दुसऱ्या बेकरी पदार्थात मिसळण्याची तयारी केली होती. कोणत्या पदार्थात किती ड्रग्ज मिसळायचं याची जबाबदारी एका 20 वर्षांच्या तरुणीवर होती. या प्रकरणात तिलाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान या तरुणीने इन्स्टाग्रामवरही काही फोटो शेअर केले होते. यात तीन वीड ब्राऊनी तयार होत असल्याचं लिहिलं आहे. धक्कादायक म्हणजे ही तरुणी महाविद्यालयात शिकते. ड्रग्ज मिसळलेले केक व पेस्ट्री कॉलेजातही देत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या 1 वर्षांपासून हे तिघे ड्रग्ज मिसळलेल्या केकचा व्यवसाय करीत होते.
हे ही वाचा-धक्कादायक! ब्युटी क्वीनचा डर्टी पिक्चर, बिजनेसमॅनकडून दीड कोटींची वसुली
कोणाकोणाला केली होती डिलिव्हरी
केकमध्ये ड्रग्ज मिसळल्यामुळे अगदी सहजपणे ते ग्राहाकांना पोहोचवित होते. हा प्रकार केव्हापासून सुरू आहे आणि कोणाकोणाला या केकची डिलिव्हरी करण्यात आल्याचा शोध घेतला जात आहे. या बेकरीमधून अनेक भागांमध्ये ऑनलाइन डिलिव्हरी केली जात होती. एप्रिल महिन्यात NCB ने हिटलरच्या बायोग्राफ्रीतून तस्करी करण्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. ड्रग्ज पुस्तकाच्या मध्ये लपवून युरोपातून भारतात पाठवलं जात होतं. ड्रग्जच्या या खेपेत LSD च्या 80 बाटल्या सापडल्या होत्या. त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Drugs, Mumbai, NCB